नागपुरातील मनीषनगरात चेन स्नॅचिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 08:34 PM2020-08-12T20:34:06+5:302020-08-12T20:35:19+5:30
मनीषनगर येथे एका महिलेची चेन स्नॅचिंग करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनीषनगर येथे एका महिलेची चेन स्नॅचिंग करण्यात आली. अनिता ज्ञानेश्वर झाडे रा. जयहिंद सोसायटी मनीषनगर या बाजारात गेल्या होत्या खरेदी करून त्या पायी घराकडे जात होत्या. दरम्यान बाईक चालक युवकाने त्यांच्या गळ्यातील २३ हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. बेलतरोडी पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.
उघड्या फ्लॅटमधून एक लाखाचे दागिने लंपास
उघड्या फ्लॅटमधून चोरट्याने एक लाखाचे दागिने लंपास केले. २५ वर्षीय श्रेया हितेश तिवारी या मानकापुरातील रुद्राक्ष रेसिडेन्सी येथे राहतात. त्या १० ऑगस्ट रोजी सायंकाळी फ्लॅटचा दरवाजा उघडा ठेवून खाली पार्किंगमध्ये गेल्या. दरम्यान त्या परत आल्यावर त्यांना टेबलवर ठेवलेल्या पर्समधून ५०० रुपये चोरीला गेल्याचे समजले. दुसऱ्या दिवशी त्यांनी बॅग तपासली तेव्हा त्यात ठेवलेले एक लाखाचे दागिनेही चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी मानकापूर पोलिसातच तक्रार दाखल केली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक
घरफोडी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. नीलेश दिलीप पोटफोडे (३०) रा. स्वागतनगर पारडी आणि फिरोज शमशाद अंसारी (२१) रा. अंबेनगर पारडी अशी आरोपीची नावे आहे. भांडेवाडी येथील रहिवासी संगीता मेश्राम यांच्या घरचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह ५० हजाराचे सामान चोरले होते. पारडी पोलिसांना तपासात आरोपींचा सहभाग असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्याना अटक करून ३६ हजार रुपयाचा माल जप्त केला.