चैतन्यने मानली नाही हार
By Admin | Published: January 10, 2016 03:25 AM2016-01-10T03:25:11+5:302016-01-10T03:25:11+5:30
चैतन्य हा वयाने लहान असला तरी जिगरबाज मुलगा आहे. गुरुवारी दुपारी जेव्हा त्याचे अपहरण केले जात होते तेव्हा त्याने प्रचंड प्रतिकार केला.
दोनदा केला पळून जाण्याचा प्रयत्न : अपहरणाची सांगितली आपबिती
नागपूर : चैतन्य हा वयाने लहान असला तरी जिगरबाज मुलगा आहे. गुरुवारी दुपारी जेव्हा त्याचे अपहरण केले जात होते तेव्हा त्याने प्रचंड प्रतिकार केला. इतकेच नव्हे तर आरोपीच्या तावडीतून पळून जाण्यासाठी त्याने एक नव्हे तर दोनदा प्रयत्न केला. परंतु त्यात त्याला यश आले नाही.
त्या दिवसाची घटना स्वत: चैतन्यने विशद केली. त्याने सांगितले, गुरुवारी दुपारी मी शाळेतून परत आलो. स्कूल बसमधून खाली उतरल्यावर माझ्या मित्रासोबत मी घराकडे निघालो होतो. त्यापैकी एक जण आला आणि त्याने माझ्या मित्राला पत्ता विचारला. त्याला तो पत्ता माहीत नव्हता. त्यामुळे त्याने मला आवाज दिला.
लगेच एक व्हॅन जोरात आली. त्याचा दरवाजा उघडाच होता. त्याने बळजबरीने मला व्हॅनमध्ये बसविले. रुमालाने माझे तोंड दाबले. मी बेशुद्ध झालो.
जेव्हा मला जाग आली तेव्हा माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. मी कुठे आहे काहीच कळत नव्हते. केवळ रेल्वेगाडीचा आवाज ऐकायला येत होता. आम्ही गाडीनेच फिरत होतो. इतके फिरत होतो की गाडीचे पेट्रोलही संपले होते. आरोपी हे आपसात बोलताना ‘नाम मत लो’ असे म्हणायचे. त्यामुळे त्यांची नावेसुद्धा कळत नव्हती.
ते माझे डोळे बांधून ठेवायचे. परंतु मला खायला द्यायचे. माझी काळजी घ्यायचे. मी ओरडलो होतो तेव्हाच त्यांनी मला दोन-तीन थापडा मारल्या. एकदा सर्व जण झोपले होते. तेव्हा मी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु बाहेर जाऊ लागताच एकाला जाग आली. त्याने मला विचारले की कुठे जात आहे, तेव्हा मी बाथरूमला जात असल्याचे सांगितले आणि पुन्हा परत आलो. तेव्हा मला सर्दी व थोडा खोकलाही होता. एकाने मला एक गोळी दिली व यामुळे खोकला बरा होईल, असे सांगितले. मी गोळी खाल्ली.
तेव्हा मला खूप झोप आली. पोलिसांमुळेच आपण आज सुखरूप आहोत. पोलिसांनी थोडा सुद्धा वेळ केला असता तर माझे बरे वाईट झाले असते, मलाही माहीत नाही. त्यामुळे पोलिसांच्या सर्व टीमला खूप-खूप थँक्स द्यायलाही चैतन्य विसरला नाही.(प्रतिनिधी)
मदत करणाराच निघाला आरोपी
सर्व जण दारू पिऊन झोपले होते. तेव्हा मी डोळ्यावरची पट्टी काढली आणि बाहेर निघालो. खूप दूरवर नदीपर्यंत आलो. वाटेत एक जण मला भेटला. त्याला मदत मागण्याच्या विचाराने मी त्याच्याकडे गेलो. त्याला मी माझे अपहरण झाल्याचे सांगितले. त्याने मला मदत करण्याचे आश्वासन देत सोबत चलण्यास सांगितले. त्याच्यासोबत गेल्यावर त्याने मला पुन्हा आरोपींकडेच आणून सोडले. तेव्हा तो मदत करणारा आरोपीपैकीच एक असल्याचे माझ्या लक्षात आले.