शेतकऱ्याचा सावकारावर चाकूहल्ला

By admin | Published: April 15, 2016 03:11 AM2016-04-15T03:11:39+5:302016-04-15T03:11:39+5:30

कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने सावकारावर चाकूहल्ला चढविला. ही घटना स्थानिक न्यायालय परिसरात बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

Chakallala of the farmer's lender | शेतकऱ्याचा सावकारावर चाकूहल्ला

शेतकऱ्याचा सावकारावर चाकूहल्ला

Next

शेतकऱ्यास अटक : कळमेश्वर न्यायालय परिसरातील घटना
कळमेश्वर : कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने सावकारावर चाकूहल्ला चढविला. ही घटना स्थानिक न्यायालय परिसरात बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. यात शेतकऱ्यास कळमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भरत यशवंतराव मगर (५६, रा. शेतकी सावंगी) असे शेतकऱ्याचे नाव आहे तर नरेंद्र श्रीकिसन व्यास (४९, रा. नागपूर) असे सावकाराचे नाव आहे. शेतकरी भरत मगर याने सावकार नरेंद्र व्यास यांच्याकडूनन सन २००० मध्ये ६० हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. सदर सावकाराने कर्जापोटी मगर यांची शेतीचे आपल्या नावे विक्रीपत्र करून घेतले होते.
मात्र कर्जाचे ६० हजार रुपये व त्यावरील व्याज असे एकूण १ लाख ४० हजार रुपये सावकाराकडे गांधीबाग, नागपूर येथे जाऊन कर्जाची परतफेड केली होती, त्यामुळे सावकारानेच आपली फसवणूक केली, असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. त्यानंतर शेतकऱ्याने गुमथळा येथील साडेचार एकर शेती विकली. यावर ‘तू शेती का विकली’ म्हणून सावकाराने सन २००५ ला शेतकऱ्याविरुद्ध कोर्टात खटला दाखल केला होता. या खटल्याच्या साक्षकामी बुधवारी कोर्टात दोघेही आले होते. दरम्यान, कर्जाच्या बोझ्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी भरत मगर याने सावकार नरेंद्र व्यास यांच्यावर न्यायालय परिसरात चाकूने हल्ला केला. यात सावकाराला गंभीर दुखापत झाली.
सदर सावकारावर यापूर्वी अनेक प्रकरणात हल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी सावकाराच्या तक्रारीवरून कळमेश्वर पोलिसांनी आरोपी शेतकऱ्याविरुद्ध भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदविला असून आरोपीला अटक केली आहे. तपास सहायक फौजदार चौधरी करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Chakallala of the farmer's lender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.