शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ चक्का जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:08 AM2021-02-07T04:08:46+5:302021-02-07T04:08:46+5:30
कळमेश्वर/सावनेर : दिल्लीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनाला नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात कळमेश्वर, ...
कळमेश्वर/सावनेर : दिल्लीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनाला नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात कळमेश्वर, सावनेर आणि बोरखेडी येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात झालेल्या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्तेही सहभागी झाले होते. कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी फाटा चौकामध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास कळमेश्वर-सावनेर महामार्गावर चक्का जाम केला. शेतकऱ्यांनी कळमेश्वर-सावनेर-काटोल महामार्गावर बैलबंड्या आणि ट्रॅक्टर आडवे करून केंद्र सरकारचा निषेध केला. सुमारे दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. केंद्राचे शेतकरीविरोधी कायदे हे पुंजीपतींना फायदा पोहोचविणारे असल्याचा आरोप याप्रसंगी स्थानिक नेते आणि शेतकऱ्यांनी केला. या आंदोलनात राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र हरणे, पंचायत समिती सभापती श्रावण भिंगारे, उपसभापती जयश्री वाळके, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाबा कोढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबाराव पाटील, काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक भागवत, माजी प्रशासक वीरेंद्रसिंह बैस, किशोर मोहोड, जिल्हा परिषद सदस्य देवानंद कोहळे, महेंद्र डोंगरे, पिंकी कौरती आदी सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कळमेश्वरचे ठाणेदार आसिफ राजा शेख यांचा उपस्थितीत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सावनेर येथील गांधी चौकात चक्का जाम आंदोलन करीत स्थानिक शेतकऱ्यांनी निदर्शने केली. या आंदोलनात पं.स. सभापती अरुणा शिंदे, उपसभापती प्रकाश पराते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गुणवंत चौधरी, पवन जयस्वाल, विजय बसवार, माजी न.प. उपाध्यक्ष गोपाल घटे, राजेश खंगारे आदी सहभागी झाले होते.