जागतिक पर्यावरण दिवस; उपराजधानीसमोर वायुप्रदूषणाचे आव्हान; ‘एक्यूआय’देखील वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:06 AM2019-06-05T10:06:52+5:302019-06-05T10:09:12+5:30
उपराजधानीची गणना देशातील ‘ग्रीन’ शहरात होत असली तरी मागील काही काळापासून शहरात प्रदूषणाची समस्या वाढायला लागली आहे. शहरातील तलाव प्रदूषित झाले आहेतच. शिवाय विविध पट्ट्यांमध्ये वायूप्रदूषणाची आकडेवारीच चिंतेत टाकणारी आहे.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीची गणना देशातील ‘ग्रीन’ शहरात होत असली तरी मागील काही काळापासून शहरात प्रदूषणाची समस्या वाढायला लागली आहे. शहरातील तलाव प्रदूषित झाले आहेतच. शिवाय विविध पट्ट्यांमध्ये वायूप्रदूषणाची आकडेवारीच चिंतेत टाकणारी आहे. ‘पीएम २.५’च्या प्रमाणात नागपूर राज्यात तिसºया स्थानी असून शहरातील वाढणारा ‘एक्यूआय’ (एअर क्वॉलिटी इंडेक्स) विविध आजारांना निमंत्रण देणारा ठरतो आहे.
मागील वर्षी ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या अहवालातून ‘पीएम २.५’च्या प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले होते. वायूप्रदूषणासंदर्भात ‘पीएम २.५’ हे ‘पीएम १०’पेक्षा जास्त घातक मानण्यात येतात. नागपुरातील ‘पीएम २.५’चे प्रमाण २०१३ साली ३३ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतके होते. २०१४ मध्ये हेच प्रमाण ३४ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटरवर गेले. तर २०१६ साली शहरात जागोजागी विकासकामांसाठी खोदकाम सुरु असताना हाच आकडा चक्क ८४ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटरवर पोहोचला होता. ‘एअर व्हिज्युअल’-‘ग्रीनपीस’ने जारी केलेल्या २०१८ च्या अहवालानुसार निर्धारित पातळीहून नागपुरात ‘पीएम २.५’चे (पर्टिक्युलेट मॅटर) प्रमाण फार जास्त आहे. विशेष म्हणजे ‘पीएम २.५’च्या प्रमाणात नागपूरचा राज्यात तिसरा क्रमांक आहे.
२०१८ साली नागपुरातील वातावरणातील ‘पीएम २.५’चे सरासरी वार्षिक प्रमाण ४६.६ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतके होते.
राज्यात मुंबई व औरंगाबादनंतर नागपुरचा तिसरा
क्रमांक होता. तर देशात नागपूर ४१ व्या स्थानी होते. २०१७ मध्ये ‘पीएम २.५’चे सरासरी प्रमाण ५६.२ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतके होते. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये ‘पीएम २.५’चे प्रमाण घटले असले तरी निर्धारित पातळीहून हा आकडा अधिकच आहे. ‘पीएम २.५’च्या वाढलेल्या प्रमाणामुळे ‘व्हिजिबिलिटी’वर परिणाम होण्याची शक्यता असते. शिवाय हे कण दूरवर वाहून जाऊ शकतात. त्यांच्या रासायनिक घटकांनुसार तलावांतील आम्लपणा वाढू शकतो. तसेच जमिनीची सुपीकतादेखील धोक्यात येऊ शकते. त्याचप्रमाणे ‘अॅसिड रेन’चे प्रमाणदेखील वाढण्याचा धोका असतो.
आंतरराष्ट्रीय मानकांपेक्षा जास्त पातळी
हवेत असलेले अतिसूक्ष्म कण, धूळ, मातीचे कण, वायू इत्यादींचे मिश्रण होऊन ‘पीएम’ (पर्टिक्युलेट मॅटर) तयार होतात. ‘पीएम २.५’ ला जास्त धोकादायक मानण्यात येते. याचा आकार २.५ मायक्रोमीटरहूनदेखील लहान असतो. हे सूक्ष्मकण श्वासनलिकेवाटे थेट शरीरात शिरण्याचा धोका असतो. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ची निर्धारित पातळी १० मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतकी आहे. तर भारतात ही पातळी ४० मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतकी आहे. या पातळीहून नागपुरात हे प्रमाण फार जास्त आहे.
नागपूरमधील ‘पीएम-२.५’चे प्रमाण
वर्ष प्रमाण (मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटरमध्ये)
२०१३ ३३
२०१४ ३४
२०१६ ८४
२०१७ ५६.२
२०१८ ४६.६