संजय रायमूलकर यांच्या जात वैधतेला आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 05:13 AM2018-04-10T05:13:17+5:302018-04-10T05:13:17+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. संजय रायमूलकर (शिवसेना) यांना अनुसूचित जाती प्रवर्गातील बलई जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.
नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. संजय रायमूलकर (शिवसेना) यांना अनुसूचित जाती प्रवर्गातील बलई जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. साहेबराव सरदार व विजय मोरे यांनी ही याचिका दाखल केली आहे.
बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र वैधता पडताळणी समितीने १० आॅक्टोबर २०१७ रोजी रायमूलकर यांना वादग्रस्त जात वैधता प्रमाणपत्र दिले आहे. रायमूलकर सुतार जातीचे असून उपविभागीय अधिकाऱ्यांनी २००६ मध्ये त्यांना या जातीचे प्रमाणपत्र दिले होते. ही जात इतर मागासवर्गीय प्रवर्गात मोडते. रायमूलकर यांचे सख्खे भाऊ प्रमोद यांना १० जानेवारी २००५ मध्ये सुतार जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
>राज्य सरकारला नोटीस उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी सोमवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर समाज कल्याण सचिव, पडताळणी समिती, राज्य निवडणूक आयुक्त, बुलडाणा जिल्हाधिकारी व डॉ. संजय रायमूलकर यांना नोटीस बजावून १ जूनपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.