सरस्वती आराधनेच्या सक्तीला आव्हान
By admin | Published: September 13, 2016 02:52 AM2016-09-13T02:52:56+5:302016-09-13T02:52:56+5:30
इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सच्या कन्या वसतिगृहात विद्येची देवता मानल्या जाणाऱ्या माता सरस्वतीच्या
नागपूर : इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सच्या कन्या वसतिगृहात विद्येची देवता मानल्या जाणाऱ्या माता सरस्वतीच्या आराधनेची सक्ती करण्यात येत असल्यामुळे एका विद्यार्थिनीच्या वडिलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.
क्षमता वासनिक असे विद्यार्थिनीचे नाव असून ती मौदा येथील रहिवासी आहे. इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समधील बी.एससी. प्रथम वर्षात तिचा प्रवेश आहे. ती गेल्या जुलैमध्ये इन्स्टिट्यूटच्या वसतिगृहात राहायला गेली. याचिकेतील माहितीनुसार, वसतिगृहाच्या कार्यालयात माता सरस्वतीची मूर्ती ठेवण्यात आली आहे. येथे माता सरस्वतीची रोज आराधना केली जाते. आराधनेसाठी वसतिगृहातील सर्व विद्यार्थिनींनी हजर राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. क्षमता एक दिवस आराधनेस उपस्थित राहिली. यानंतर तिने माता सरस्वतीची आराधना करण्यास नकार दिला. यानंतर तिला विविध प्रकारे त्रास देणे व धमकावणे सुरू झाले. तिला एकटे पाडण्यात आले.
यामुळे तिने ३ आॅगस्ट रोजी संस्था संचालकांकडे तक्रार केली पण, त्याची दखल घेण्यात आली नाही. ६ आॅगस्ट रोजी तिने संचालकांना स्मरणपत्र दिले. परंतु, कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. परिणामी तिने २८ आॅगस्ट रोजी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तिची तक्रार स्वीकारली, पण एफआयआर नोंदविला नाही. यामुळे क्षमताचे वडील सिद्धार्थ वासनिक यांच्यासह उमेश गजभिये यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
शासकीय अनुदानित संस्था असल्यामुळे राज्यघटनेनुसार या ठिकाणी एका धर्माशी संबंधित उपक्रम राबविले जाऊ शकत नाही. यासंदर्भात आवश्यक निर्देश देण्यात यावेत, वसतिगृहातील कार्यालयातून माता सरस्वतीची मूर्ती हटविण्यात यावी, कार्यालयात धार्मिक उपक्रम राबविण्यास मनाई करण्यात यावी व क्षमताला माता सरस्वतीच्या आराधनेत सहभागी होण्याची सक्ती करण्यात येऊ नये असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकेत सामाजिक न्याय विभागाचे सचिव, उच्च व तंत्र शिक्षण संचालक, इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सचे संचालक डॉ. रामदास आत्रात, वसतिगृह अधीक्षिका मीरा आळशी व सीताबर्डी पोलीस निरीक्षकांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष १४ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
यापूर्वी एक सुनावणी झाली असून न्यायालयाने शासनाच्या वकिलाला यासंदर्भात माहिती घेण्यास सांगितले आहे.
याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. भावना कासारे कामकाज पहात आहेत.(प्रतिनिधी)