‘आंतरराष्ट्रीय’ तोगडियांसमोर विदर्भात आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:14 AM2018-06-25T10:14:49+5:302018-06-25T10:17:12+5:30
विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद या नव्या संघटनेची घोषणा केली. संघटनेला तोगडिया यांनी जरी ‘आंतरराष्ट्रीय’ नाव दिले असले तरी, प्रत्यक्षात कार्यप्रणाली ही जवळपास ‘विहिंप’सारखीच राहणार आहे.
योगेश पांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद या नव्या संघटनेची घोषणा केली. संघटनेला तोगडिया यांनी जरी ‘आंतरराष्ट्रीय’ नाव दिले असले तरी, प्रत्यक्षात कार्यप्रणाली ही जवळपास ‘विहिंप’सारखीच राहणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या विदर्भातील नवीन लोकांना जोडणे व संघटनेचे वेगळेपण सिद्ध करण्याचे मोठे आव्हान तोगडियांच्या समर्थकांसमोर राहणार आहे. विशेष म्हणजे, ‘विहिंप’मधून आलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांसमवेत नवीन लोकांनादेखील जबाबदारी देण्याची संघटनेची भूमिका असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दिल्ली येथे रविवारी झालेल्या बैठकीला विदर्भातून सुमारे ७० ते ८० कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. ‘विहिंप’मधून राजीनामे देऊन हे सर्व जण तोगडिया यांच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत. विदर्भातील संघटनेचे नेमके स्वरूप हे जुलै महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत ठरविण्यात येईल. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संघटनमंत्री महावीर हे यावेळी उपस्थित राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘विहिंप’मध्ये असताना डॉ. प्रवीण तोगडिया यांचे नागपुरात नियमित दौरे व्हायचे व ते येथील कार्यकर्ते-पदाधिकाºयांच्या संपर्कात असायचे. त्यांच्याकडे पाहून अनेक तरुण विहिंपच्या कार्यात सहभागी झाले. विहिंप म्हणजे तोगडिया असे समीकरण तयार झाले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जाहीर टीका केल्यानंतर तोगडियांबाबत संघ परिवारात नाराजीचा सूर निर्माण झाला होता. ‘विहिंप’च्या इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकांत तोगडिया यांच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी ‘विहिंप’ला ‘रामराम’ केला.
‘विहिंप’चे कार्यकर्ते जोडण्यावर भर
तोगडियांच्या समर्थनार्थ विदर्भ व नागपुरातूनदेखील अनेक कार्यकर्त्यांनी तसेच पाऊल उचलले. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद स्थापन झाल्यानंतर संघटन मजबुतीसाठी कार्यकर्ते जोडावे लागणार आहेत. यासाठी सर्वात अगोदर तर ‘विहिंप’, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाच जोडण्याचा प्रयत्न करण्यात येण्याची दाट शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तरुणांना संघटनेत आणण्यावर भर
विदर्भात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेसमोर अनेक आव्हाने राहणार आहेत. नवीन संघटना असल्यामुळे सर्वात अगोदर नवीन लोक जोडावे लागणार आहेत. तोगडिया यांना मानणारे अनेक तरुण विदर्भ व नागपुरात आहेत. संघटनेच्या भूमिकेनुसार नव्या तरुणांना जोडण्यावर भर देण्यात येणार आहे. जुन्या कार्यकर्त्यांसोबतच त्यांनादेखील संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल, असे आंतरराष्ट्रीय हिंदू संघटनेचे पदाधिकारी राजेश शुक्ला यांनी सांगितले.
‘विहिंप’चा दावा, संघटना मजबूत
यासंदर्भात ‘विहिंप’चे पदाधिकारी अधिकृतरीत्या बोलण्यास तयार नाहीत. मात्र एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने गोपनीयेतच्या अटीवर तोगडिया यांच्या संघटनेला आम्ही गंभीरतेने घेत नसल्याचे सांगितले. ‘विहिंप’चे पदाधिकारी आपल्या कार्यात व्यस्त आहेत व कुणीही संघटना सोडून जाणार नाहीत. आतापर्यंत जे गेले त्यात महत्त्वाचे कुणीही पदाधिकारी नव्हते. विदर्भात ‘विहिंप’ मजबूत आहे, असा दावा त्यांनी केला.