मेट्रो रेल्वेच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान
By admin | Published: October 19, 2016 03:07 AM2016-10-19T03:07:54+5:302016-10-19T03:07:54+5:30
मेट्रो रेल्वेच्या डब्यांचे डिझाईन, उत्पादन, पुरवठा, तपासणी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यासंदर्भातील निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी भारत अर्थ मुव्हर्स कंपनीची
तांत्रिक बोली अपात्र ठरविली : भारत अर्थ मुव्हर्स कंपनीची याचिका
नागपूर : मेट्रो रेल्वेच्या डब्यांचे डिझाईन, उत्पादन, पुरवठा, तपासणी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यासंदर्भातील निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी भारत अर्थ मुव्हर्स कंपनीची तांत्रिक बोली नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने अपात्र ठरविली आहे. या निर्णयाविरुद्ध कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.
मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्लुर व न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी मंगळवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला नोटीस बजावून एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. तसेच, या प्रकरणात चायना रेल्वे रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशनला प्रतिवादी करण्यास सांगितले.
मेट्रो कॉर्पोरेशनने चायना रेल्वेची निविदा मंजूर केली आहे. मेट्रो कॉर्पोरेशनने २५ जानेवारी रोजी नोटीस जारी करून मेट्रो रेल्वेच्या डब्यांचे उत्पादन व इतर बाबींसाठी निविदा आमंत्रित केल्या होत्या. निविदा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कंपनीला मेट्रो रेल्वेच्या डब्यांचे डिझाईन व उत्पादनाचा १० वर्षांचा अनुभव आवश्यक होता.
याशिवायही विविध पात्रता निकष होते. कॉर्पोरेशनने २९ सप्टेंबर रोजी भारत कंपनीला ई-मेल पाठवून त्यांची तांत्रिक बोली अपात्र ठरविण्यात आल्याचे कळविले. हा निर्णय रद्द करून तांत्रिक बोलीचा पुनर्विचार करण्यात यावा, आर्थिक बोली उघडण्यात यावी व निविदा वाटप करण्यास मनाई करण्यात यावी अशी विनंती कंपनीने न्यायालयाला केली आहे.(प्रतिनिधी)