रीळ सजविणाऱ्यांपुढे रिअल लाईफ लढाईचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:07 AM2021-04-03T04:07:17+5:302021-04-03T04:07:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : निवडणुकांचा बिगुल वाजला रे वाजला की सुरू होते प्रचाराची धामधूम. या धामधुमीत मतदारांना आकर्षित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : निवडणुकांचा बिगुल वाजला रे वाजला की सुरू होते प्रचाराची धामधूम. या धामधुमीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी अवाच्या सव्वा घोषणांची सरबत्ती उडते. पक्ष-प्रतिपक्षांतील उमेदवार एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडतात. कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांच्या, पक्षांच्या विजयासाठी मार्ग सुकर करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करतात. कुठे तोंडातोंडी, तर कुठे हाणामारी अन् कुठे जुनी जळमटे चव्हाट्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू होतात. एका अर्थाने चित्रपटाचा रंजक, मनोरंजक पट निकालाच्या दिवसापर्यंत मतदारांना बघता, अनुभवता येतो. यात सेलिब्रिटी हा एक अतिशय महत्त्वाचा फॅक्टर म्हणून नेहमीच पुढे येताना दिसतो. सेलिब्रिटीमध्ये सर्वांत अग्रेसर असतात ते चित्रपट अभिनेते, अभिनेत्री. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत चित्रपट अभिनेते-अभिनेत्री मोठ्या संख्येने उतरले आहेत. रुपेरी पडद्यावर खलनायक, प्रस्थापित सत्तेविरुद्ध लढ्यात उतरलेला नायक-नायिक यांच्या कवायती प्रत्यक्ष ‘याचि देही, याचि डोळा’ बघण्याची संधी या माध्यमातून सर्वसामान्य मतदारांना मिळत आहे आणि हाच फॅक्टर कॅश करण्यासाठी राजकीय पक्ष कंबर कसून तयारीला लागल्याचे दिसून येत आहे.
सध्या देशात पश्चिम बंगालसह, तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी, आसाम येथे विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या सर्वांत लक्षवेधी ठरत आहे ती पश्चिम बंगालची निवडणूक. तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातच ही निवडणूक लढली जात असल्याचा दिखावा सर्वत्र दिसून येत आहे. इतर पक्ष उच्चारायलाही नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत हे दोन्ही पक्ष रुपेरी पडद्यावरील सेलिब्रिटीना आपल्या भात्यात एका अस्त्राप्रमाणे वापरण्यास सज्ज आहेत. सेलिब्रिटीना आपल्याकडे ओढण्यात तृणमूल काँग्रेसचा हातखंडा राहिला आहे. जुना इतिहास बघता, हे स्पष्ट होते. भाजपही यात मागे नाही. म्हणूनच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूलमधील अनेक मोठे नेते आपल्याकडे वळविण्यासाठीची प्रारंभीपासूनच भाजपने कंबर कसली. त्यानंतर रणनीतीला वेगळा आयाम देत भाजपने रुपेरी पडद्यावरील सेलिब्रिटींना आपल्याकडे ओढण्यास सुरुवात केली आहे. यात सर्वांत महत्त्वाचे ठरले ते ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती.
ब्रिगेड मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत मिथुनदांनी भाजपत प्रवेश केला. कधीकाळी ममतादीदींच्या सर्वांत जवळचे म्हणून ओळखले जाणाऱ्या मिथुनदांना आपल्या पक्षात ओढत सेलिब्रिटींच्या लढ्यात अर्धीअधिक लढाई जिंकण्यात भाजपने बाजी मारली आहे. यासोबत भाजपने दूरदर्शनवरील तारे-तारका व इतर लोकप्रिय व्यक्तींनाही निवडणुकीच्या झंजावातात उतरविले आहे. मात्र, खरेच का हे सेलिब्रिटी या राजकीय पक्षांना सत्तेची दोरी मिळवून देतील, हा प्रश्न आहे.
---------
राजकारण आणि चित्रपट
सिनेमाचा पट रंगविताना पटकथाकार आपले लक्ष्य निश्चित करीत असतो. मात्र, राजकारणात चांगले नि वाईट, हे कोण ठरवणार? कोणी जिंकला म्हणून तो चांगला आणि पराभूत म्हणून तो वाईट, असे म्हणता येऊ शकते का? असा प्रश्न येथील सुज्ञ, सुशिक्षित सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. राजकारण हा चित्रपटाचा आवडता विषय असला तरी चित्रपटातील ठोकताळे प्रत्यक्ष राजकारणात साधले जात नाहीत. चित्रपटातून व्यक्त केल्या जाणाऱ्या अपेक्षा या कल्पनाविलास असतात. त्या कल्पना प्रत्यक्षात साकारणे भाषिक, जातीय, धार्मिक बीजारोपणात तंतोतंत उतरणे कधीच शक्य नसतात.
------------
काही आपुलकीचे तर काही परके
निवडणुकीत दोन्ही पक्षांनी सेलिब्रिटींना उतरविले आहे. मात्र, हे सेलिब्रिटी मतदारांच्या माथी मारल्यासारखी स्थिती आहे. अनेक सेलिब्रिटी पक्षांचे झेंडे घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरले जरूर. मात्र, काही राज्यातील दुसऱ्या शहरातील तर काही राज्याबाहेर घर असणारे आहेत. कार्यकर्ते उमेदवार कुठलाही असला तरी त्यासाठी प्रयत्न करतील, मत देतील, मत देण्यास मतदारांना आवाहन करतील. मात्र, प्रत्यक्ष मतदार कोण जवळचा आणि कोण परका, असा विचार नक्की करीत आहेत. बंगालमधील मतदारांच्या मतांवरून हे स्पष्ट होत आहे.