पर्यावरण विषयाची परीक्षा अडचणीत
By admin | Published: February 9, 2016 03:03 AM2016-02-09T03:03:43+5:302016-02-09T03:03:43+5:30
सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण हा विषय अभ्यासक्रमात सक्तीचा केला आहे. परंतु शिक्षण विभागाने त्याला गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसते आहे.
इतर शिक्षकांवर भार : शिक्षण विभागाला गांभीर्यच नाही
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण हा विषय अभ्यासक्रमात सक्तीचा केला आहे. परंतु शिक्षण विभागाने त्याला गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसते आहे. कारण दरवर्षी पर्यावरण विषयाची मूल्यमापन पद्धती बदलते आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी बारावीच्या मौखिक परीक्षा बाह्य परीक्षकांद्वारे घेण्याचे ठरविले आहे. बहुतांश शाळेत पर्यावरण विषयासाठी स्वतंत्र शिक्षक नाही. त्यामुळ मौखिक परीक्षेसाठी बोर्डाने इतर विषयाच्या शिक्षकांची निवड केली आहे.
या शिक्षकांना २० गुण विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. पर्यावरणाचे ज्ञानच नसलेले शिक्षक विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घेणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी संभ्रमात असून शिक्षकही अडचणीत आले आहे. राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सध्या एचएससी बोर्ड मार्च २०१६ मध्ये होऊ घातलेल्या तोंडी व प्रात्याक्षिक परीक्षा सुरू आहे. यात पर्यावरण विषयाची चांगलीच गोची झाली आहे. दरवर्षी पर्यावरणाच्या मूल्यमापनाची पद्धत बदलत आहे. गेल्यावर्षी विद्यार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयातील शिक्षकांना परीक्षा घेऊन गुण देण्याचा अधिकार होता. यावर्षी विद्यार्थ्यांच्या मौखिक परीक्षा बाह्य शिक्षकांकडून घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला. मंडळाचा निर्णय योग्य असला तरी, पर्यावरण विषयातील शिक्षकच उपलब्ध नसल्याने इतर विषयांच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी लागत आहे.
सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत पर्यावरण विषयात उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. परंतु ७० टक्के महाविद्यालयांमध्ये हा विषय शिकवायला शिक्षकच नाही. वर्कलोड कमी असलेल्या शिक्षकाला पर्यावरण विषय शिकवावा लागत आहे. मंडळाने सर्वच विषयाच्या २० गुणांच्या मौखिक परीक्षा सक्तीच्या केल्या आहे. ज्या महाविद्यालयात इतर विषयाच्या शिक्षकावर पर्यावरणाचा भार आहे. अशा शिक्षकांना स्वत:च्या विषयाच्या परीक्षा, पर्यावरण विषयाच्या परीक्षेचे नियोजन आणि बाहेरच्या शाळेत जाऊन परीक्षा घेण्याची कसरत करावी लागत आहे.
या परीक्षेसाठी वेळही अतिशय कमी असल्याने, शिक्षक अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे शिक्षकांना परीक्षेचे मूल्यमापन कसे करायचे याचे मार्गदर्शन करण्यात आलेले नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी महाविद्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहे. (प्रतिनिधी)