एचसीबीए अध्यक्ष निवडीला आव्हान : दिवाणी न्यायालयात दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 09:04 PM2019-10-22T21:04:27+5:302019-10-22T21:05:25+5:30
हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदी अॅड. गौरी वेंकटरमण यांची निवड करण्याच्या निर्णयाविरुद्ध अॅड. वसंत भांबुरकर यांनी कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदी अॅड. गौरी वेंकटरमण यांची निवड करण्याच्या निर्णयाविरुद्ध अॅड. वसंत भांबुरकर यांनी कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. वादग्रस्त निर्णय अवैध ठरवून रद्द करण्यात यावा व हे पद विद्यमान पदाधिकारी वगळता अन्य सदस्यांमधून भरण्यात यावे असे भांबुरकर यांचे म्हणणे आहे. न्यायालयाने संघटनेचे सचिव व अॅड. वेंकटरमण यांना समन्स बजावून यावर उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.
संघटनेच्या घटनेतील आर्टिकल ९ अनुसार कार्यकारी मंडळाला कार्यकारिणीतील रिक्त पद भरण्याचा अधिकार आहे व हे पद विद्यमान पदाधिकारी वगळता अन्य सदस्यांमधून भरायला पाहिजे. परंतु, कार्यकारी मंडळाने १६ ऑगस्ट २०१९ रोजी ठराव पारित करून उपाध्यक्ष अॅड. वेंकटरमण यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यामुळे आर्टिकल ९ मधील तरतुदींचे उल्लंघन झाले. कार्यकारिणीतील रिक्त पद विद्यमान पदाधिकाऱ्यांमधून भरण्याची संघटनेच्या घटनेत तरतूद नाही असे भांबुरकर यांनी दाव्यात नमूद केले आहे.
संघटनेची नोंदणी नाही
हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरची अद्याप नोंदणी करण्यात आली नाही याकडे भांबुरकर यांनी या दाव्यामध्ये लक्ष वेधले आहे. संघटनेची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे असेही त्यांनी म्हटले आहे.