आधुनिक जीवनशैलीच्या आजारांचा सामना करण्याचे आव्हान : डॉ. प्रतीत समदानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 10:36 AM2022-05-05T10:36:46+5:302022-05-05T10:38:32+5:30

‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स-२०२१’च्या सोहळ्यात त्यांनी ‘जीवनशैली आणि आरोग्यविषयक आजार’ या विषयावर बीजभाषण केले.

Challenges of coping with modern lifestyle ailments says dr. pratit samdani | आधुनिक जीवनशैलीच्या आजारांचा सामना करण्याचे आव्हान : डॉ. प्रतीत समदानी

आधुनिक जीवनशैलीच्या आजारांचा सामना करण्याचे आव्हान : डॉ. प्रतीत समदानी

Next
ठळक मुद्देभारतातील श्रीमंत लोकांना आरोग्याच्या जास्त समस्या

नागपूर : आधुनिक जीवनशैलीमुळे आपल्या जगासोबतच आपल्या देशातदेखील अनेक आजार वाढले आहे. या आजारांना ‘मॉडर्न सिव्हिलायझेशन डिजिज’ किंवा ‘वेल्थ डिजिज’ असेदेखील संबोधल्या जाऊ लागले आहे. भारतात तर श्रीमंत लोकांनाच आरोग्याच्या जास्त समस्या दिसून येत आहेत. अमेरिका, यू.के. सह इतर विकसित देशांमध्ये नेमके उलटे चित्र आहे, असे प्रतिपादन मुंबईतील प्रसिद्ध फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. प्रतीत समदानी यांनी केले. ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स-२०२१’च्या सोहळ्यात त्यांनी ‘जीवनशैली आणि आरोग्यविषयक आजार’ या विषयावर बीजभाषण केले.

देशातील श्रीमंत लोकांना विविध जीवनशैलीच्या आजारांनी ग्रासले आहे. लठ्ठपणा हे या आजारांचे एक प्रमुख कारण आहे. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की सुशिक्षित लोक अशिक्षित लोकांपेक्षा जास्त लठ्ठ आहेत, शहरवासी हे ग्रामीण लोकांपेक्षा जास्त वजनाचे आहेत व महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त लठ्ठपणा आहे. सुमारे ४० टक्के भारतीयांचे वजन सामान्यहून जास्त आहे, असे ते म्हणाले.

आधुनिक आजार आणि मृत्यूचे आणखी एक प्रमुख कारण वाढते प्रदूषण हे आहे. जगातील १०.३ दशलक्ष मृत्यूंपैकी अडीच दशलक्ष मृत्यू प्रदूषणामुळे होतात. महात्मा गांधींनी १०० वर्षांपूर्वी स्वच्छ हवा आणि पाण्याच्या महत्त्वावर भर दिला होता. शारीरिक स्वास्थ्यासाठी मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे उदासीनता, चिंता आणि इतर मानसिक आजार वाढत आहेत. लोकांना क्वचितच आराम मिळतो. एखाद्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही जितके आनंदी आहात तितके तुम्ही निरोगी असाल, असे त्यांनी सांगितले.

डॉ. समदानी यांनी जीवनशैलीतील आजारांचे महत्त्व सांगण्यासाठी महात्मा गांधींचा ‘शरीराचा वापर कचरापेटी म्हणून करायचा नाही’ हा संदेश दिला.

चांगल्या आरोग्यसाठी जीवनशैलीतील दहा बदल

-दर आठवड्याला २.५ ते ३.५ तास व्यायाम केला पाहिजे. यात वेगवान चालणे, पोहणे किंवा गोल्फ इत्यादींचा समावेश असू शकतो.

-जर तुम्ही एरोबिक्स किंवा वेगवान सायकलिंगसाठी गेलात तर दीड तास पुरेसे असतील.

- दिवसातून दहा हजार पावले चालण्याचा प्रयत्न करा.

- संतुलित आहारावर भर हवा. सर्व पोषक घटकांचा समावेश असलेली ‘कलरफुल’ थाळी हवी.

- जेवणात पोळी किंवा भात यापैकी एक पदार्थ खावा, दोन्ही खाणे टाळावे. जर दोसा खायचा असेल तर, रवा दोसा खाण्यावर भर द्यावा.

- दारू आणि तंबाखूपासून दूर रहावे.

- दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.

- दिवसातून सहा ते आठ तास झोप व्हायला हवी.

- कुटुंब आणि मित्रांसोबतच्या नात्याकडे कोणीही दुर्लक्ष करू नये.

- ध्यान, योगासने, हलके संगीत याद्वारे तणाव कमी करण्यावर भर द्यावा.

Web Title: Challenges of coping with modern lifestyle ailments says dr. pratit samdani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.