परिस्थितीच्या आव्हानांनी त्यांना 'सावित्री' बनविले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 11:54 PM2020-01-03T23:54:18+5:302020-01-03T23:55:19+5:30

भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘वुई फॉर चेंज’ या संघटनेतर्फे ‘मी सावित्री’ या विशेष कार्यक्रमाचे शुक्रवारी फुटाळा तलावावर आयोजन करण्यात आले.

The challenges of the situation made them a 'Savitri' | परिस्थितीच्या आव्हानांनी त्यांना 'सावित्री' बनविले 

परिस्थितीच्या आव्हानांनी त्यांना 'सावित्री' बनविले 

Next
ठळक मुद्दे‘मी सावित्री’ने बोलते केले : महिला, मुलींनी मांडला रोजचा संघर्ष

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : दहा वर्षापूर्वी पतीचे आकस्मिक निधन झाले तेव्हा गीताताईचे वय कमीच होते. अंगावर तीन मुलांची जबाबदारी होती. अशा कठीण प्रसंगी कुटुंबाचा, नातेवाईकांचाही आधार मिळाला नाही. अशा परिस्थितीत ती सावित्री झाली. एकटीने हिमतीने कष्ट उपसत मुलांना शिकविले, छोटेसे हक्काचे घर बांधले, मुलीचे लग्न केले, मुले नोकरीलाही लागली. पण तीच मुले लग्नानंतर वेगळा संसार मांडायला निघाली. बांधलेले घर जोडून ठेवण्याचे नवे आव्हान गीताताई समोर आहे. अशीच एक ऋचिता. मुलाशी मैत्री केली म्हणून घरच्यांनी शिक्षणच बंद करून घरात डांबले. अशावेळी ७० वर्षाची आजी तिच्यामागे सावित्री बनून खंबीरपणे उभी राहिली व शिक्षणासाठी नागपूरला पाठविले. ही ऋचिता आज एम.ए. (इंग्लिश) च्या फायनल इयरला आहे. रोजच्या जीवनात संघर्ष करताना अशा असंख्य सावित्रीच्या लेकी आपल्या आसपास आहेत. त्यातीलच काहींनी आपल्या संघर्षाचा उलगडा केला.
भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘वुई फॉर चेंज’ या संघटनेतर्फे ‘मी सावित्री’ या विशेष कार्यक्रमाचे शुक्रवारी फुटाळा तलावावर आयोजन करण्यात आले. संघटनेच्या संयोजक रश्मी पारसकर यांच्या मार्गदर्शनात झालेल्या कार्यक्रमात वेगवेगळ्या वयाच्या, स्तराच्या महिला व मुलींनी आपला संघर्ष मुक्तपणे मांडला. लठ्ठपणामुळे घरच्यांचा चिंतासूर ऐकणारी व बाहेरच्यांची टिंगल सहन करणारी अंकिता, कमी वयातच पतीच्या निधनामुळे सहन करावा लागत असलेला मानसिक त्रास मांडणारी भारती, अशा अनेक स्त्रियांनी आपल्या भावना येथे व्यक्त केल्या. प्रत्येक क्षेत्रात वावरणाऱ्या स्त्रीला संघर्ष करावा लागतो. तिच्या असण्या-दिसण्यावरून, कमजोर समजण्यावरून बरेचदा आप्त व समाजाशी संघर्ष करावा लागतो. तो लहान असो की मोठा, संघर्ष केल्याशिवाय पुढे जाता येत नाही, हेच यातून दिसून येते. पत्रकार रश्मी मदनकर यांनी मार्गदर्शन करीत युवकांना केवळ स्वत: पुरते जगू नका इतरांसाठी जगा, इतरांसाठी केलेला संघर्ष आणि त्यातून मिळणारे समाधान हे शाश्वत राहत असल्याचे सांगितले. दर्शना व जितेशा चावरे या दाम्पत्याची ‘सावित्री’ नावाची चिमुकली कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. सावित्री आईच्या कार्याचे सतत स्मरण होत राहावे म्हणून मुलीचे नाव सावित्री ठेवल्याचे आईने यावेळी सांगितले. संचालन स्नेहल वानखेडे हिने केले. आयोजनात योगिता भिवापूरकर, अलका वेखंडे यांचा सहभाग होता.

Web Title: The challenges of the situation made them a 'Savitri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.