नागपूरच्या विकासात चेंबरने सहकार्य करावे : नितीन गडकरी यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:08 PM2019-07-20T23:08:36+5:302019-07-20T23:09:48+5:30

देशात नागपूरचा विकास वेगाने होत आहे. त्या प्रमाणात व्यापारी आणि उद्योजकांचा विकास महत्त्वाचा आहे. अनेक योजनांमध्ये व्यापाऱ्यांचा सहभाग असावा, असे शासनाचे मत आहे. त्याकरिता केंद्र आणि राज्य शासन सर्वतोपरी मदत करीत आहे. नागपूरच्या विकासात चेंबरने सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

Chamber should cooperate in the development of Nagpur : Nitin Gadkari's appeal | नागपूरच्या विकासात चेंबरने सहकार्य करावे : नितीन गडकरी यांचे आवाहन

नागपूरच्या विकासात चेंबरने सहकार्य करावे : नितीन गडकरी यांचे आवाहन

Next
ठळक मुद्देएनव्हीसीसीचा अमृत महोत्सवी कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात नागपूरचा विकास वेगाने होत आहे. त्या प्रमाणात व्यापारी आणि उद्योजकांचा विकास महत्त्वाचा आहे. अनेक योजनांमध्ये व्यापाऱ्यांचा सहभाग असावा, असे शासनाचे मत आहे. त्याकरिता केंद्र आणि राज्य शासन सर्वतोपरी मदत करीत आहे. नागपूरच्या विकासात चेंबरने सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
नाग विदर्भ ऑफ चेंबरतर्फे (एनव्हीसीसी) अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी हॉटेल तुली इम्पेरियलमध्ये करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानाहून गडकरी बोलत होते. व्यासपीठावर खा. कृपाल तुमाने, महापौर नंदा जिचकार, चेंबरचे अध्यक्ष हेमंत गांधी, सचिव अ‍ॅड. संजय अग्रवाल, अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश मेहाडिया आणि संयोजक सीए बी.सी. भरतीया उपस्थित होते. यावेळी लोकमत समूहाचे बिझनेस एडिटर सोपान पांढरीपांडे यांचा सत्कार करण्यात आला.
चेंबरने देशातील संघटनांप्रमाणे कार्य करावे
गडकरी म्हणाले, चेंबरला ७५ वर्षे पूर्ण झाली असून नागपूरची क्षमता पाहून पुढील २५ वर्षांचे व्हिजन डाक्युमेंट तयार करावे. फिक्की, सीआयआय संघटनेप्रमाणे काम करावे. त्यांच्या सहकार्याने नागपुरात सक्षम व्यापारी बाजारपेठा उभ्या राहतील. चेंबरने व्यापाऱ्यांच्या कर समस्या, अडचणी सोडविण्यासोबतच व्यापाऱ्यांचा विकास कसा होईल, याकडे लक्ष द्यावे. शहरातील सुविधांचा लाभ व्यापाऱ्यांना मिळवून द्यावा. त्याकरिता केंद्र आणि राज्य शासन चेंबरच्या पाठिशी आहे. इतवारी, शहीद चौक, मस्कासाथ येथील व्यापाऱ्यांना नवीन मार्केटमध्ये सुविधायुक्त जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बुधवार बाजार आणि सक्करदरा बाजाराचे डिझाईन तयार आहे. व्यावसायिक मार्केट तयार होणार आहे. हरिहर मंदिरजवळ नवीन मार्केट तयार होत आहे. या सर्वांचा व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गडकरी यांनी केले.
देशात नागपूरचा विकास वेगात
नागपूरच्या विकासावर बोलताना गडकरी म्हणाले, नागपूर विमानतळ जीएमआरला हस्तांतरित करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम दोन वर्षांत पूर्ण होईल. त्यामुळे नागपूर जगाशी जोडले जाईल आणि विमानतळाची कार्गो आणि पॅसेंजर हबची संकल्पना पूर्णत्वास येईल. मिहानमध्ये दोन हजार एकरवर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. डिझाईन तयार आहे. सेंटरमध्ये वर्षभर प्रदर्शने होतील. त्यामुळे व्यवसाय वाढेल आणि व्यापाराला गती मिळेल. अजनी स्टेशनजवळ मल्टीमॉडेल हब तयार करण्यात येत आहे. त्याकरिता केंद्राने ८०० कोटी मंजूर केले आहे.
रेल्वे, फूड कॉर्पोरेशन आणि कारागृृहाची जागा घेण्यात येणार आहे. गडकरी म्हणाले, हिंगणा आणि बुटीबोरी एमआयडीसीमध्ये नवीन युनिट येत आहेत. वर्ल्ड बँकेतर्फे लो हाऊसिंग प्रकल्प आणि केएफडब्ल्यू बँकेतर्फे एमआयडीसीमध्ये सोलर रुफ टॉप लावण्याची योजना आहे. मिहानमध्ये एचसीएल कंपनी विस्तारीकरणात आणखी १० हजार युवकांना रोजगार देणार आहे. सोलर चरखा क्लस्टरसाठी केंद्र १० कोटी देणार आहे. लॉजिस्टिक पार्क संकल्पनेत फ्युचर ग्रुप मुख्य कार्यालय मिहानमध्ये आणत आहे. त्यामुळे १० हजार युवकांना रोजगार मिळेल. शहारात मोठी गुंतवणूक करणाऱ्यांचा सत्कार करावा. त्यामुळे व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील, असे गडकरी म्हणाले.
लघु उद्योजकांना ४५ दिवसांत त्यांच्या मालाचे पैसे मिळत नाहीत. त्यांच्यासाठी समाधान पोर्टल सुरू करण्यात आले. त्यांना वेळेत पैसा मिळेल. अलीबाबा व अ‍ॅमॅझॉन एका वेबसाईटवर येऊन लघु उद्योगांसाठी जॉईंट व्हेंचर तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे १० हजार कोटींचा व्यवसाय होईल.
प्रारंभी हेमंत गांधी यांनी चेंबरच्या कार्याची माहिती दिली. बी.सी. भरतीया यांनी व्यवसायात येणाऱ्या अडचणींवर कशी मात करायची, यावर मार्गदर्शन केले. यावेळी चेंबरच्या ७५ वर्षांचा इतिहास असलेल्या ‘अमृतपुष्प’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. चेंबरचे उपाध्यक्ष फारुख अकबानी यांनी आभार मानले. कार्यक्रमात चेंबरचे कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, उपाध्यक्ष अश्विन मेहाडिया, चेंबरचे माजी अध्यक्ष, सहसचिव स्वप्निल अहिरकर, अनिल अहिरकर, माजी आ. रमेश बंग, गिरीश गांधी, तेजिंदरसिंग रेणू, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नगरसेविका प्रगती पाटील, चेंबरचे सर्व पदाधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Chamber should cooperate in the development of Nagpur : Nitin Gadkari's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.