प्रचंड तणावात चमचमवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 10:31 PM2019-06-11T22:31:42+5:302019-06-11T22:38:22+5:30

तृतीयपंथीयांचे नेतृत्व करण्याच्या वादातून हत्या करण्यात आलेली तृतीयपंथी चमचम गजभिये हिच्यावर मानकापूर घाटात तणावपूर्ण वातावरणात मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत चमचमचे साथीदारच नव्हे तर ठिकठिकाणच्या तृतीयपंथीयांनी चमचमच्या अंत्यसंस्काराला गर्दी केली होती. दरम्यान, चमचमच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप असूनही कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

Chamcham's cremation in huge tension | प्रचंड तणावात चमचमवर अंत्यसंस्कार

प्रचंड तणावात चमचमवर अंत्यसंस्कार

Next
ठळक मुद्देपोलिसांनी घेतला सुटकेचा नि:श्वास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तृतीयपंथीयांचे नेतृत्व करण्याच्या वादातून हत्या करण्यात आलेली तृतीयपंथी चमचम गजभिये हिच्यावर मानकापूर घाटात तणावपूर्ण वातावरणात मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत चमचमचे साथीदारच नव्हे तर ठिकठिकाणच्या तृतीयपंथीयांनी चमचमच्या अंत्यसंस्काराला गर्दी केली होती. दरम्यान, चमचमच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप असूनही कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.  


कळमन्यातील कामनानगरात मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास तृतीयपंथीयांचा गुरू म्हणून ओळखला जाणाऱ्या तृतीयपंथी उत्तमबाबाने आपल्या साथीदारांसह चमचम गजभियेवर प्राणघातक हल्ला चढवला होता. तृतीयपंथीयांच्या गटाची गादी (गुरुपद) आणि रोजच्या कमाईतील हिस्सा मिळावा यासाठी सध्याचा गुरू उत्तमबाबा याला चमचमने आव्हान दिले होते. तिने आपला वेगळा गट निर्माण केला होता. महिन्याला तीन ते चार लाख रुपये उत्तमला नाहक द्यावे लागत असल्याने चमचमने विरोध चालविला होता. तर, चमचम रोजची हजारोंची कमाई लपवून योग्य तेवढा हिस्सा प्रामाणिकपणे देत नसल्याचा संशय आल्याने उत्तमबाबा त्याच्यावर चिडून होता. नेतृत्व आणि पैशाच्या हिस्सेवाटणीमुळे त्यांच्यातील वाद तीव्र झाला होता. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी, ४ जूनला दुपारी १.३० वाजता चमचमच्या कामनानगरातील घरात शिरून उत्तमबाबा, चट्टू ऊर्फ कलम उईके, किरण गौरी, निसार शेख आणि लखन पारशिवनीकर यांनी चमचमवर चाकूने प्राणघातक हल्ला चढवला होता. या हल्ल्यात चमचम गंभीर जखमी झाली. खासगी रुग्णालयात सहा दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या चमचमला डॉक्टरांनी सोमवारी रात्री मृत घोषित केले. हे वृत्त कळताच चमचमच्या समर्थकांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला.
तणाव अन् कडक कारवाईचा दम 

शहरात तृतीयपंथीयांनी घातलेल्या गोंधळाची माहिती असल्यामुळे पोलिसांवर प्रचंड दडपण आले होते. पोलिसांनी कळमन्यासह तृतीयपंथीयांचे वास्तव्य असलेल्या विविध भागात मोठा बंदोबस्त लावला होता. सोमवारी रात्री उशिरापर्यंत कळमना पोलीस ठाण्यासमोर तृतीयपंथीयांची गर्दी वाढतच होती. त्यामुळे चमचमचे समर्थक आणि उत्तमबाबाचे समर्थक या दोन्ही गटांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी समजावून सांगितले. चमचमच्या समर्थकांची शोकसंतप्तता लक्षात घेता या प्रकरणात हत्येच्या गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी उत्तमबाबा, कलम उईके, किरण गौरी, निसार शेख आणि लखन पारशिवनीकर यांना अटक करण्यात आल्याचेही सांगितले. त्यांची मंगळवारी पोलीस कोठडी वाढवली जाणार आहे. त्यामुळे कोणताही गोंधळ घालून पोलिसांच्या कारवाईत अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगतानाच गोंधळ घातल्यास कडक कारवाई करू, असा दमही देण्यात आला होता.
मंगळवारी सकाळपासून मेयोसमोर मोठ्या प्रमाणात तृतीयपंथीयांनी गर्दी केली होती. काहींनी घोषणाबाजी केल्यामुळे ते आता गोंधळ घालतात की काय, असा दडपण वाढवणारा प्रश्न पोलिसांना पडला होता. मात्र, पोलिसांनी कारवाईची तंबी देत अंत्यसंस्कार करून घेण्याची सूचना केल्याने चमचमच्या साथीदारांनी मानकापूर घाटावर चमचमवर शोकसंतप्त वातावरणात दुपारी अंत्यसंस्कार केले. मोठा तणाव असूनही कोणतीच गोंधळाची घटना घडली नसल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
वाद तीव्र होणार
उत्तम आणि किरण यांना न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांची कोठडी वाढवून घेतली. त्यांना सुरक्षेच्या कारणावरून दुसऱ्या पोलीस ठाण्यात हलविण्यात आले. दरम्यान, नेतृत्वाच्या वादातून चमचमचा गेम झाल्याने आता हा वाद अधिक तीव्र होणार असा अंदाज वर्तविला जात आहे. चमचमचेही अनेक साथीदार जहाल वृत्तीचे असून ते कोणत्याही थराला जाऊन उत्तमचा गेम करू शकतात. रुग्णालयात त्यांनी ही बाब उघडपणे बोलून दाखविल्याची चर्चा आहे. दरम्यान, उत्तमकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असून, तो शोधण्यासाठी काही तासात पोलीस त्याच्याशी संबंधित ठिकाणी छापेमारी करू शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे.

Web Title: Chamcham's cremation in huge tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.