ब्लेडने कापले चिमुकल्यांचे गळे
By admin | Published: October 6, 2016 02:54 AM2016-10-06T02:54:04+5:302016-10-06T02:54:04+5:30
गीतानगर, मानकापूर येथील एका युवकाने शेजाऱ्याचा पाच वर्षाचा मुलगा आणि अडीच वर्षाच्या मुलीचा गळा ब्लेडने कापल्यावर आत्महत्येचा प्रयत्न केला.
नागपूर : गीतानगर, मानकापूर येथील एका युवकाने शेजाऱ्याचा पाच वर्षाचा मुलगा आणि अडीच वर्षाच्या मुलीचा गळा ब्लेडने कापल्यावर आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दोन्ही मुलांवर आणि आरोपी युवकावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे.
विलास भागवत भुजाडे असे आरोपीचे नाव आहे. तो गीता नगरात राहतो. कारपेंटरचे काम करतो. त्याच्या आईवडीलांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबात पत्नी वंदना, भाऊ नितीन आणि दीड वर्षाचा मुलगा आहे. विलासच्या घरासमोरच दिगांबर वाकोडे राहतो. त्याच्या कुटुंबात पत्नी, पाच वर्षाचा मुलगा क्रिश आणि अडीच वर्षाची मुलगी निहारिका आहे. तो मागील सहा-सात वर्षांपासून अरविंद काथोरे यांच्या घरी भाड्याने राहतो. विलास आणि अरविंदच्या कुटुंबात चांगले संबंध आहेत. बुधवारी दुपारी ४ वाजता क्रिश आणि निहारिका वस्तीतील सार्वजनिक दुर्गा मंडळातील भजनाच्या कार्यक्रमात बसले होते. विलासने दोघांनाही चिप्स देण्याच्या बहाण्याने सोबत नेले. दोघेही मुलं त्याच्यासोबत गेले. त्याने वस्तीतील किराणा दुकानातून चिप्स खरेदी केले. मुलांना चिप्स देऊन तो अरविंद काथोरेच्या इमारतीच्या छतावर दोन्ही मुलांना घेऊन गेला. याच इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर दिगांबरचे कुटुंब राहते. विलास मुलांना इमारतीच्या छतावर घेऊन गेला. तिथे त्याने अगोदर ब्लेडने क्रिशचा गळा कापला. त्यानंतर निहारिकाचा गळा कापू लागला. दरम्यान दोन्ही मुलं आरडाओरड करीत पळू लागले.
‘सुसाईड नोट’मध्ये रहस्य
नागपूर : क्रिश इमारतीवरून धावत खाली उतरला. मुलांचा आरडाओरडा ऐकून विलासची आजी, पत्नी वंदना, दिगांबरची पत्नी छताकडे धावत गेले. सर्वात अगोदर विलासची आजी छतावर पोहोचली. तिला पाहून विलासने निहारिकाला सोडले आणि स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने वार केला. त्याचवेळी त्याची पत्नी आणि दिगांबरची पत्नी पोहोचले. दिगांबरच्या पत्नीने मुलांना आपल्याजवळ घेतले तर विलासला त्याची पत्नी त्याला ब्लेडने वार करण्यापासून रोखू लागली. विलास तिला दूर करू लागला. याच वेळी आरडाओरड ऐकून वस्तीतील लोकही गोळा झाले. त्यांना पाहून विलास पहिल्या माळ्यापर्यंत आला आणि तिथून खाली उडी घेऊन पळू लागला. लोकांनी त्याला पकडले आणि मानकापूर पोलिसांना सूचना दिली.
दोन्ही मुलांची प्रकृती नाजुक असल्याने नागरिकांनी पोलिसांची वाट पाहण्यापेक्षा मुलांना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले. मानकापूर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. इमारतीच्या छतावर रक्त पसरले होते. विलासने वापरलेल्या चार ब्लेडही पडलेल्या होत्या. त्यामुळे विलासने अगोदरच योजना आखली असल्याचा संशय आहे. त्याने ब्लेडचे पाकीट खरेदी केले होते. ठरलेल्या योजनेनुसार तो सकाळपासूनच घरी होता. मुलं एकट्यात भेटण्याची तो वाट पाहत होता. मुलांचे वडील दिगांबर वाकोडे खासगी कंपनीत काम करतात. त्याची पत्नी घरी मेणबत्त्या आणि पणत्या तयार करण्याचे काम करते.
विलासने अचानकपणे असे कृत्य केल्याने वस्तीतील लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित एसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले की, मुलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विलासवर पोलिसांच्या पहाऱ्यात उपचार सुरू आहे. विलासने घटनेच्या पूर्वीच ‘सुसाईड नोट’ लिहून ठेवली होती. त्यात त्याने दोन्ही मुलं त्याची असल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी त्याच्या आजीच्या तक्रारीच्या आधारावर खुनाचा आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)