नागपुरातील सदर उड्डाणपुलावर चमकोगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 09:48 PM2020-01-03T21:48:35+5:302020-01-03T21:54:18+5:30
सदरमधील उड्डाण पूल पूर्ण झाल्याचे दिसून येत असले तरी अजूनही या पुलाचे काम सुरू आहे. शुक्रवारी काही उपद्रवींनी पूल वाहतुकीसाठी खुला करीत चमकोगिरी केली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन या उपद्रवींना ताब्यात घेतले आणि पूल पुन्हा बंद केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदरमधील उड्डाण पूल पूर्ण झाल्याचे दिसून येत असले तरी अजूनही या पुलाचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास अपघाताला आमंत्रण दिल्यासारखे होईल. परंतु काही उपद्रवींना याच्याशी काहीही घेणे-देणे नाही. शुक्रवारी काही उपद्रवींनी पूल वाहतुकीसाठी खुला करीत चमकोगिरी केली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन या उपद्रवींना ताब्यात घेतले आणि पूल पुन्हा बंद केला.
सदर येथील हा नवनिर्मित पूल वाहतूक व्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. हा पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. परंतु वाहतुकीसाठी मात्र तो अजूनही तयार नाही. एनएचएआयचे महाव्यवस्थापक नरेश वडेट्टवार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काम केले जात आहे. मार्किंग, पेंटिंग केली जात आहे. सहा ते सात दिवसात काम पूर्ण होईल. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल. परंतु काही उपद्रवींना याच्याशी काहीही घेणे-देणे नाही. ते शुक्रवारी दुपारी पूल वाहतुकसाठी खुला करण्यासाठी पोहोचले. ते स्वत:ला काँग्रेसचे कार्यकर्ता असल्याचे सांगत त्यांनी पुलावरील बॅरिकेट हटवून खुला केला. वाहन चालकांना पुलावरून जाण्यास सांगितले. अनेक वाहन चालकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून पुलावर वाहन घेऊन गेले. कुठलीही अप्रिय घटना घडली नाही म्हणून ठीक झाले. एखादा अपघात झाला असता तर त्याची जबाबदारी कुणी घेतली असती. याचा विचारही या उपद्रवींनी केला नाही. यातही या उपद्रवींनी येथे एक बोर्ड लावला. यात एका संस्थेला उड्डाण पुलाच्या बांधकामाचे श्रेय देण्यात आले आहे.
पक्षाचा काहीही संबंध नाही
ज्या काँग्रेस पक्षाचे नाव घेऊन या उपद्रवींनी पूल सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्या पक्षाचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी मात्र पक्षाशी त्यांचे काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, ही केंद्र सरकारची योजना आहे. त्यांनी एनएचआयकडे पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती. काही टिंगल टवाळी करणाऱ्या लोकांनी पक्षाच्या नावावर पूल उघडण्याचा प्रयत्न केला.
काम पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक शक्य नाही
सदर उड्डाण पुलाच्या कामात आठ महिन्याचा उशीर झाला आहे. २ जानेवारी रोजी याचे लोकार्पण होणार होते. परंतु काम अपूर्ण असल्याचे ते शक्य झाले नाही. पुलाचे काम पूर्ण झाल्याशिवाय पुलावरून वाहतूक सुरु केली जाऊ शकत नाही, असे एनएचएआयचे महाव्यवस्थापक नरेश वडेट्टवार यांनी स्पष्ट केले.