चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनी स्फोट, नागरिकांच्या भावनांचा उडाला भडका

By नरेश डोंगरे | Published: June 14, 2024 10:24 PM2024-06-14T22:24:17+5:302024-06-14T22:24:31+5:30

नागपूर-अमरावती महामार्गावर असलेल्या धामना येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या पॅकेजिंग विभागात गुरुवारी दुपारी १२.४५ वाजता भीषण स्फोट झाला.

Chamundi Explosive Company Blast, Citizens' Emotions Flare Up | चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनी स्फोट, नागरिकांच्या भावनांचा उडाला भडका

चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनी स्फोट, नागरिकांच्या भावनांचा उडाला भडका

नरेश डोंगरे / जितेंद्र उके

धामना, नागपूर :
चामुंडी एक्सप्लोसिव्ह प्रा. लि. कंपनीत गुरुवारी घडलेल्या भीषण स्फोटामुळे गावातील पाच तरुणींसह सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे आणि तिघे गंभीर अवस्थेत मृत्यूशी संघर्ष करीत असल्यामुळे धामना-लिंगा पंचक्रोशितील नागरिकांच्या भावनांचा शुक्रवारी अक्षरश: भडका उडाला. शुक्रवारी सकाळपासूनच पंचक्रोशितील हजारो नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने धामना गाठून दिवसभर कंपनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. कधी पोलिसांचे कठडे (बॅरिकेडस्) उलटे पाडले तर कधी रास्ता रोको केला. नंतर मात्र मृतदेहांसह कंपनीच्या प्रवेशद्वारावर धडक देऊन तब्बल तीन तास आक्रोश केला. मृतदेहाची आता जास्त विटंबना होऊ नये, असा समजूतीचा सूर निघाल्यानंतर मावळत्या सूर्याच्या साक्षीने गावातील पाचही लेकींवर शोकाकुल वातावरणात एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तरुणी-महिलाच नव्हे तर अनेक जण ओक्साबोक्सी रडत होते.

नागपूर-अमरावती महामार्गावर असलेल्या धामना येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या पॅकेजिंग विभागात गुरुवारी दुपारी १२.४५ वाजता भीषण स्फोट झाला. त्यामुळे प्रांजली किसन मोदरे (वय २२), वैशाली आनंदराव क्षीरसागर (वय २०), प्राची श्रीकांत फलके (वय १९), मोनाली शंकरराव अलोने (वय २५) आणि शीतल आशिष चटप (वय ३०) या पाच तसेच पन्नालाल बंदेवार (वय ६०, रा. सातनवरी) अशा सहा जणांचा करुण अंत झाला. तर, जखमींपैकी दानसा मरसकोल्हे (वय २६, रा. मध्य प्रदेश) यानेही शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान प्राण सोडला. डॉ. पिनाक दंदे यांनी रात्री ८.१५ च्या सुमारास मरस्कोल्हेला मृत घोषित केले. त्यामुळे आता या स्फोटातील मृतांची संख्या ७ वर पोहचली आहे. श्रद्धा वनराज पाटील (वय २२, रा. धामना) आणि प्रमोद चवारे (वय २५, रा. नेरी) हे दोघे गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत.

दरम्यान, या भीषण स्फोटाचे वृत्त कळताच आजुबाजुच्या गावातील हजारो शोकसंतप्त नागरिक शुक्रवारी सकाळपासूनच धामना गावात गर्दी करू लागले. दुसरीकडे शोकाकुल गावकऱ्यांचे सांत्वन करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार श्यामकुमार बर्वे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार सुनील केदार, आमदार समीर मेघे, पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, माजी जि. प. अध्यक्षा सुनीता गावंडे यांच्यासह गावोगावचे सरपंच, जि.प. पं.स.चे सदस्य मोठ्या संख्येत धामन्यात पोहचले. पोलीस आयुक्तांकडून स्फोटाच्या घटनेची तसेच अनिल देशमुख यांच्याकडून मृताच्या कुटुंबियांची माहिती जाणून घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. झालेल्या घटनेवर दु:ख व्यक्त करून त्यांनी मृताच्या नातेवाईकांना कंपनी प्रशासनाकडून प्रत्येकी २५ लाख, तर राज्य सरकारकडून प्रत्येकी १० लाख, असे एकूण ३५ लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली. कंपनी प्रशासनाने तातडीने मदतीचा धनादेश मृतकांच्या कुटुंबियांना मिळवून द्या, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान, गडकरी तसेच वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करताना मदतीचा धनादेश तातडीने मृतांच्या कुटुंबियांना मिळवून देण्याचे ठोस आश्वासन देणारे अधिकारी नेत्यांच्या गाड्या गावातून निघून जाताच सुस्तावल्यासारखे झाले. २. ते २.३० च्या सुमारास प्रांजली, वैशाली, प्राची, मोनाली आणि शितल या पाच जणींचे मृतदेह धामना गावाच्या वेशिवर पोहचले. तेव्हा उपस्थित अधिकाऱ्यांनी तातडीने अंत्यसंस्कार करून घ्या, असा सूर लावला. मात्र, कंपनी प्रशासनाकडून मदतीचा धनादेश कधी येणार, असा प्रश्न आ. देशमुख आणि सुनीता गावंडे यांनी केला असता अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शोकसंतप्त नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या. जोपर्यंत कंपनीकडून मदतीचा धनादेश मृतांच्या कुटुंबियांना मिळणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ईशारा देऊन गावकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. अर्धा-एक तास होऊनही संबंधित अधिकारी ठोस काही सांगायला तयार नसल्याने नागरिकांनी अमरावती मार्गावर रस्ता रोको आंदोलन सुुरू केले.

बॅरिकेडस् वर रोष व्यक्त

आंदोलक तीव्र घोषणाबाजीही करीत होते. मोठ्या संख्येत नागरिकांनी कंपनीच्या प्रवेशद्वाराकडे धाव घेतली. परिस्थिती चिघळण्याचे संकेत मिळताच प्रचंड पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. पोलीस उपायुक्त अनुराग जैन, उपायुक्त विजयकांत सागर हे अतिशय संयमाने परिस्थिती हाताळत संतप्त नागरिकांना शांत करण्याचे प्रयत्न करीत होते. मात्रद, जमावातील काही जणांनी कंपनीच्या गेटसमोर लावलेले बॅरिकेडस् खाली लोटण्याचे प्रयत्न चालविले. त्यामुळे तिकडून नागरिक आणि ईकडून पोलीस अशी जोरअजमाईशही काही वेळ चालली. मृतदेह असलेली वाहिका थेट कंपनीच्या प्रवेशद्वारावरच लावली. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. याचवेळी जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने काही वेळेसाठी जमाव ईकडे तिकडे झाला. घटनास्थळी तातडीने मदतीचे धनादेश पाठविले नाही तर काहीही होऊ शकते, असे पोलीस अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर घडामोडी वेगवान झाल्या आणि सायंकाळी ६.३० वाजता कंपनीतर्फे धनादेश घेऊन तहसीलदार धामन्यात पोहचले. माजी मंत्री देशमुख यांच्या हस्ते हे धनादेश मृताच्या कुटुंबियांना देण्यात आले.

काळीज हेलावणारे दृष्य

प्रांजली, वैशाली, प्राची, मोनाली आणि शितल यांची एकाचवेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. केवळ धामनाच नव्हे तर आजुबाजुच्या गावातील मंडळीही मोठ्या संख्येत या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. कंपनीचा प्रशासनाचा धिक्कार करत, मायमाऊल्याच नव्हे तर मृत तरुणींसोबत काम करणाऱ्या तरुणी, महिलांना हुंदके आवरणे कठीण झाले होते. अनेकजणी अक्षरश: ओक्साबोक्सी रडत होत्या. हे दृष्या काळीज हेलावणारे होते. त्यांना एकाचवेळी अग्नी देण्यात आला. यावेळी जवळपास प्रत्येकच जणाने पाणावलेल्या डोळ्यांनी मृत तरुणींना शेवटचा निरोप दिला.

Web Title: Chamundi Explosive Company Blast, Citizens' Emotions Flare Up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.