‘चाणक्य’ने जागविली राष्ट्रधर्माची प्रेरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:28 AM2018-12-11T00:28:04+5:302018-12-11T00:29:51+5:30
राष्ट्रधर्माशिवाय कुठलाच धर्म, कुठलीच नीती श्रेष्ठ न मानणारे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व म्हणजे विष्णुगुप्त आर्य चाणक्य. भारतात २३०० वर्षांपूर्वी एक मुरब्बी, मुत्सद्दी राजकीय मार्गदर्शक, आक्रमक विधानातून नेमकेपणाने राष्ट्रीयतेची नीती शिकविणारे गुरू, विद्वेषी आणि लोभी राज्यांच्या खंडाखंडात विभागलेल्या भारतास एकसंध, एकछत्र राष्ट्रनिर्मितीसाठी ‘शेंडीला गाठ बांधणार नाही’ अशी प्रतिज्ञा करीत दासीपुत्र व शूद्र म्हणून हिणवलेल्या पराक्रमी चंद्रगुप्ताच्या नेतृत्वात आपली शपथ पूर्ण करणारे आर्यपुत्र कुलगुरू अशी ओळख असलेले चाणक्य. राष्ट्रधर्माची प्रेरणा जागविणाऱ्या या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे जाज्वल्य दर्शन सोमवारी नागपूरकरांना झाले. निमित्त होते खासदार महोत्सवांतर्गत आयोजित चाणक्य या ऐतिहासिक महानाट्याचे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रधर्माशिवाय कुठलाच धर्म, कुठलीच नीती श्रेष्ठ न मानणारे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व म्हणजे विष्णुगुप्त आर्य चाणक्य. भारतात २३०० वर्षांपूर्वी एक मुरब्बी, मुत्सद्दी राजकीय मार्गदर्शक, आक्रमक विधानातून नेमकेपणाने राष्ट्रीयतेची नीती शिकविणारे गुरू, विद्वेषी आणि लोभी राज्यांच्या खंडाखंडात विभागलेल्या भारतास एकसंध, एकछत्र राष्ट्रनिर्मितीसाठी ‘शेंडीला गाठ बांधणार नाही’ अशी प्रतिज्ञा करीत दासीपुत्र व शूद्र म्हणून हिणवलेल्या पराक्रमी चंद्रगुप्ताच्या नेतृत्वात आपली शपथ पूर्ण करणारे आर्यपुत्र कुलगुरू अशी ओळख असलेले चाणक्य. राष्ट्रधर्माची प्रेरणा जागविणाऱ्या या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे जाज्वल्य दर्शन सोमवारी नागपूरकरांना झाले. निमित्त होते खासदार महोत्सवांतर्गत आयोजित चाणक्य या ऐतिहासिक महानाट्याचे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेत साकारलेल्या खासदार महोत्सवात अभिनेता, दिग्दर्शक मनोज जोशी यांच्या या अद्भूत कलाकृतीचे यावर्षी दुसऱ्यांदा सादरीकरण झाले. विशेष म्हणजे गेल्या २९ वर्षांपासून ऐतिहासिक पात्राच्या माध्यमातून राष्ट्रवादाने ओतप्रोत भरलेल्या या महानाट्याचे देश-विदेशात हजाराच्यावर प्रयोग झाले असून, नागपुरात झालेला हा १०६९ वा प्रयोग होता. सुरुवातीपासून आतापर्यंत तेवढ्याच ताकदीने मांडलेले हे महानाट्य प्रेक्षकांना भारावून सोडणारे ठरले. इ.पूर्व ३२० च्या काळात तक्षशिला, पाटलीपुत्र व मगधच्या राजकीय सारीपाटावर रंगलेला स्वार्थाचा डाव. अनेक देश पादाक्रांत करून झेलमच्या काठापर्यंत पोहोचलेले युनानी अलेक्झांडरचे आक्रमण आणि त्याच्याशी न लढताच पराभव व मांडलिकत्व पत्करलेले अंबी, धनानंदसारख्या राजांच्या कृतीने हा देश दुखावलेला होता. अशावेळी राजनीती, अर्थनीती व ज्योतिषाचार्यात पारंगत असलेल्या चाणक्य यांनी तक्षशिलेचे कुलगुरूपद त्यागून चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या नेतृत्वात एकछत्र राष्ट्रनिर्मितीस पुढाकार घेतला व बुद्धिकौशल्याने हा प्रण पूर्णही केला. अशा या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा वेगवान प्रवास म्हणजे चाणक्य हे महानाट्य.
राष्ट्रवादाची ज्योत प्रज्वलित करणारे हे महानाट्य प्रेक्षकांना अक्षरश: भारावून सोडते. मातब्बर अभिनेता मनोज जोशी या नाटकाची जान आहेत. वास्तविक नाटकाची पार्श्वभूमी सांगतानाच मनोज जोशी यांनी ‘हे नाटक आजच्या राजकीय, सामाजिक व वैयक्तिक परिस्थितीशी साधर्म्य साधत असेल तर तो योगायोग नाही, ही वस्तुस्थितीच आहे. कारण जातीभेदाला खतपाणी घालणाऱ्या राजकारणामुळे आजही तीच परिस्थिती आहे’ असे सांगत चाणक्य व चंद्रगुप्तासारख्या राष्ट्राभिमानी व्यक्तिमत्त्वाची किती आवश्यकता आहे, याचे दर्शन घडविणारेच आहे.
म्हणूनच १००० वर प्रयोग झाले तरी हे नाटक तेवढेच जिवंत आणि प्रेरक वाटते. अभिनेता म्हणून चाणक्यच्या रूपात मनोज जोशी यांनी मंच व्यापून टाकला आहे. तरी प्रत्येक कलावंतांनी त्यांच्या पात्रांना १०० टक्के न्याय दिल्याचे क्षणोक्षणी जाणवते. म्हणूनच नाटकात येणारा प्रत्येक क्षण दर्शकांनी अभिमानाने अनुभवला. आजच्या परिस्थितीत चाणक्यची विचारधारा, राष्ट्रवादाची तत्त्वप्रणाली नव्या पिढीसमोर मांडण्याचे धाडस मनोज जोशी व त्यांच्या ४० कलावंतांनी पोटतिडिकीने केले आहे. या अद्भूत अशा महानाट्याला प्रेक्षकांकडूनही तेवढाच जोशपूर्ण प्रतिसाद मिळाला.
तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी खासदार दत्ता मेघे, आमदार नागो गाणार, प्रा. अनिल सोले, सुधाकर देशमुख, राजेंद्र पुरोहित, ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, एनव्हीसीसीचे अध्यक्ष विष्णू पचेरीवाला, बी.सी. भरतीया, उद्योजक रतन चौधरी, कवी मधुप पांडेय, जयप्रकाश गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
भाषा, वेगवान कथानक व संवादाने भारावले
दीर्घ नाटकाचा रोमांच कायम ठेवण्यासाठी फिरता रंगमंच व आकर्षक नेपथ्याची नितांत आवश्यकता असते. चाणक्य मात्र याला अपवाद ठरले. नाटकात मोजकेच नेपथ्य असले तरी मनोज जोशींसह इतर सर्व कलावंतांचा जिवंत अभिनय व वेगवान कथानकामुळे क्षणोक्षणी हे नाटक रोमांचक, उत्कंठा वाढविणारे आणि खिळवून ठेवते. लक्ष वेधणारी भाषा आणि प्रभावी संवादामुळे नाटकातील प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते.
यांचा झाला सत्कार
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नाट्य क्षेत्रातील किशोर कुळकर्णी, देवेंद्र दोडके, मुकुल खोत, प्रभाकर ठेंगडी, जयंत पाचपोर, विलास मानेकर, श्रद्धा तेलंग, बाबा धुळधुळे, रूपेश पवार, सुनंदा साठे, देवेन लुटे, छाया कावळे, संजय भाकरे, अनिल पालकर, दादू शक्ती रतने या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.