चक्रीवादळाची शक्यता पण महाराष्ट्रात प्रभाव नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2022 08:48 PM2022-10-18T20:48:27+5:302022-10-18T20:50:09+5:30
Nagpur News बंगालच्या उपसागरात हाेणाऱ्या बदलामुळे आंध्रप्रदेशातील नेल्लोरच्या पश्चिम-मध्य समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण हाेण्याची शक्यता आहे,पण त्याचा महाराष्ट्रात काहीही परिणाम हाेणार नाही, असा दावा हवामान विभागाने केला आहे.
नागपूर : पावसाळा डिसेंबरपर्यंत वाढणार,दिवाळीच्या काळात चक्रीवादळ येणार,अशा बातम्या पसरवून भीती दाखविली जात आहे. मात्र या निव्वळ अफवा असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बंगालच्या उपसागरात हाेणाऱ्या बदलामुळे आंध्रप्रदेशातील नेल्लोरच्या पश्चिम-मध्य समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण हाेण्याची शक्यता आहे,पण त्याचा महाराष्ट्रात काहीही परिणाम हाेणार नाही, असा दावा हवामान विभागाने केला आहे.
हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी याबाबत खुलासा केला. बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान बेटा जवळ चक्रीय वाऱ्याची स्थिती असून येत्या दाेन दिवसात बेटाच्या पश्चिमेला कमी दाबाचे आणि धनत्रयोदशीला अतितीव्र कमी दाबाचे (डिप्रेशन) क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या प्रभावाने दिवाळीनंतर २६ व २७ तारखेला आंध्रप्रदेशातील नेल्लोरच्या आग्नेयला पश्चिम-मध्य समुद्रात कदाचित चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता जाणवते. मात्र महाराष्ट्रात त्याचा प्रभाव दिसणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले. ८-१० दिवसानंतर चित्र अधिकच स्पष्ट होईल पण नागरिकांनी याची भीती बाळगण्याचे कारण नाही,असे त्यांनी सांगितले.
दरम्यान मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी यवतमाळ,वर्धा वगळता विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात उघाड हाेता. वर्ध्यात १२ तासात २५ मिमी पावसाची नाेंद झाली. साेमवारी रात्री मात्र विदर्भात सर्वत्र पाऊस बरसला. ब्रम्हपुरी व यवतमाळला पावसाने चांगलेच झाेडपले. ब्रम्हपुरीत ५८.६ मिमी पावसाची नाेंद झाली तर,यवतमाळात सकाळपर्यंत ४४.२ मिमी नाेंदविण्यात आला. नागपूरला सकाळपर्यंत २६.३ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात पारशिवनीला ४०.१ मिमी सह जाेरदार हजेरी लावली. गाेंदियात १८.४ मिमी पाऊस झाला. इतर ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. पावसामुळे दिवसाचे तापमान खाली घसरले आहे.
२० ऑक्टाेबरनंतर माघारी....
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ व मराठवाड्यात बुधवारपासून पावसाची उघडीप राहील. मात्र पुढचे एक-दाेन दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात गुरुवार नंतरच उघाड हाेईल. दरम्यान परतीचा पाऊस वेगाने माघारी सरकत असून २० ऑक्टाेबरनंतर ताे महाराष्ट्रातून पूर्णपणे बाहेर निघून जाईल,असा अंदाज हवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात येत आहे.