विदर्भात आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता! पारा घसरला
By निशांत वानखेडे | Published: August 17, 2024 07:03 PM2024-08-17T19:03:37+5:302024-08-17T19:05:36+5:30
नागपूर : दाेन दिवसांपासून पावसाळी ढगांमुळे तापमान सरासरीच्या खाली
नागपूर : राज्यातील बहुतेक भागात पावसाचा जाेर कमी असल्याने व तापमान वाढल्याने पिकांना ओढ लागण्याची भीती असताना विदर्भात मात्र पुढचा आठवडाभर म्हणजे २५ ऑगस्टपर्यंत जाेरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
आाॅगस्टच्या पहिल्या पंधरवाड्यात शांतता बाळगल्यानंतर विदर्भात १५ ऑगस्टपासून पावसाची सक्रियता पुन्हा वाढली आहे. काही वेळाच्या अंतराने हलक्या सरींचा वर्षाव हाेत आहे. शुक्रवारी नागपुरात दिवसभर रिमझिम सुरू हाेती. शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारात ढगांच्या प्रचंड गडगडाटासह हलक्या सरींनी हजेरी लावली. दिवसभर आकाश पावसाळी ढगांनी व्यापले हाेते. नागपूरसह बहुतेक सर्व जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाल्याचे चित्र आहे.
पावसाळी जाेर कमी झाल्याने दिवसाचे तापमान वाढले हाेते व ढगांच्या उपस्थितीमुळे उकाडा वाढल्याचे जाणवत हाेते. मात्र दाेन दिवसांपासून पावसाळी ढगांमुळे तापमान सरासरीच्या खाली आले असून उकाडा काहीसा कमी झाल्याचे जाणवत आहे.