पुढील चोवीस तासात विदर्भात विजांसह पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 11:25 AM2020-09-22T11:25:26+5:302020-09-22T11:27:11+5:30
विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तासात विजांसह मध्यम ते साधारण स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तासात विजांसह मध्यम ते साधारण स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मागील २४ तासांपासून विदर्भातील वातावरणात बदल झाला आहे. आकाशात ढग असून काही ठिकाणी पाऊस पडला. २० सप्टेंबरच्या सायंकाळी बहुतेक ठिकाणी विजांसह पाऊस झाल्याची नोंद आहे. वेधशाळेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी तसेच भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया आणि वाशीम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना आवाहन
वातावरणातील या बदलांचा अंदाज घेऊन शेतकरी बांधवांनी स्वत:ची आणि जनावरांची काळजी घ्यावी, तसेच विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन ग्रामीण कृषी मोसम सेवा, जिल्हा कृषी हवामान केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्राने केले आहे.