नागपुरात पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:09 AM2021-04-09T04:09:06+5:302021-04-09T04:09:06+5:30
नागपूर : तापमान वाढ झाल्याने नागपूरसह विदर्भाच्या बहुतेक भागातील नागरिक सध्या भीषण उष्णता व उन्हाने त्रस्त झाले आहेत. बुधवारप्रमाणे ...
नागपूर : तापमान वाढ झाल्याने नागपूरसह विदर्भाच्या बहुतेक भागातील नागरिक सध्या भीषण उष्णता व उन्हाने त्रस्त झाले आहेत. बुधवारप्रमाणे गुरुवारीही लाेकांना उन्हाचे चटके सहन करावे लागले. मात्र शुक्रवारी हवेची दिशा बदलताच वातावरण बदलण्याची शक्यता असून, नागपूरसह विदर्भात वेगवान वाऱ्यासह हलका पाऊस हाेण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही भागात गुरुवारीच हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याची नाेंद आहे. त्यामुळे काही भागात ऊन कमी जाणवलेेे; पण उष्णता जाणवत हाेती. शहरात मात्र उन्हाचे चटके कायम हाेते. सायंकाळी वाऱ्यासह थाेडा दिलासा मिळाला.
हवामान विभागानुसार सध्या उत्तर-पश्चिम दिशेने हवा वाहत आहे. बुधवारी व गुरुवारी ऊन व उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नव्हती. विदर्भाच्या अकाेला, अमरावती, चंद्रपूर, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण वारे वाहण्याचा अंदाज आहे. गुरुवारी रात्रीपासून हवेचे स्वरूप बदलण्याची शक्यता असून, ताे पूर्वेकडे वाहणारा असेल. नागपूरसह चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिराेली, गाेंदिया व यवतमाळमध्ये वेगाच्या वाऱ्यासह हलका पाऊस हाेण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. यामुळे कमाल तापमानातही घट हाेण्याचा अंदाज आहे.