४१ वर्षांनंतर नागपुरात साईपादुका दर्शनाचा योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 09:39 PM2018-01-17T21:39:28+5:302018-01-17T21:40:45+5:30
यंदाचा गुरुवार साईभक्तांसाठी विशेष योग घेऊन येणारा ठरणार आहे. तब्बल ४१ वर्षानंतर पुन्हा एकदा नागपुरात साईबाबांच्या चर्मपादुकांचे आगमन झाले असून गुरुवारी साईभक्तांना त्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. श्री साईबाबा मंदिर, वर्धा मार्ग येथे या चर्मपादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदाचा गुरुवार साईभक्तांसाठी विशेष योग घेऊन येणारा ठरणार आहे. तब्बल ४१ वर्षानंतर पुन्हा एकदा नागपुरात साईबाबांच्या चर्मपादुकांचे आगमन झाले असून गुरुवारी साईभक्तांना त्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. श्री साईबाबा मंदिर, वर्धा मार्ग येथे या चर्मपादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. १ आॅक्टोबर २०१७ ते १८ आॅक्टोबर २०१८ या साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने हे आयोजन करण्यात आले आहे.
१७ जानेवारीला रात्री ८ वा. चर्मपादुकाचे आगमन झाले. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. नागपूरसह मध्यभारतात साईबाबांचे मोठ्या प्रमाणावर भक्त आहे. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या सहकार्याने श्री साईबाबा सेवा मंडळ, साई मंदिर, विवेकानंद नगर यांनी १८ जानेवारीचा नियोजनबध्द कार्यक्रम आखला आहे. साईबाबा मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमाप्रमाणे सकाळी ५.१५ वा. काकड आरती नंतर भक्तांना पादुकांचे दर्शन घेता येईल. सकाळी ६.४५ वा जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. सकाळी ७ वाजता श्री साईबाबांच्या पादुकांचे पूजन होणार असून सकाळी ११ वा भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर महाप्रसाद वितरण होणार आहे. या ठिकाणी दर्शन सुलभतेने करता यावे यासाठी सुमारे ३०० स्वयंसेवक परिसरात उपस्थित राहणार आहे. साई मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या गजानन महाराज मंदिर आणि राममंदिर लगतच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. १८ जानेवारीला शेवटच्या व्यक्तीला पादुकांचे दर्शन घेता येणार आहे. साईभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.