चंद्रकांत रागीट महात्मा गांधी हिंदी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 11:04 PM2020-01-07T23:04:30+5:302020-01-07T23:06:26+5:30
वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. चंद्रकांत शामराव रागीट यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी नुकतीच या पदाची जबाबदारी स्वीकारली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदीविद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. चंद्रकांत शामराव रागीट यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी नुकतीच या पदाची जबाबदारी स्वीकारली. याअगोदर ते सर्वोदय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अऊन्ड टेक्नॉलॉजी येथे प्राचार्य पदावर कार्यरत होते.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे यथून अभियांत्रिकी विषयाची पदवी घेतली. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून एमटेक व पीएचडीची पदवी संपादित केली. त्यांनी दहा वर्षे राष्ट्रीय पातळीवरील अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये सेवा दिली. तर राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य पदाचा तसेच प्रशासकीयपदाचा १५ वर्षांचा अनुभव आहे. विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमासोबतच आचार्य विनोबा भावे यांच्या आचार्य कुलाचे अधिकारी म्हणूनही ते काम करत आहे. बाबा आमटे यांच्या भारत जोडो अभियानामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. गीताई मिशन पवनार आश्रम येथे पूर्ण वेळ सेवा दिली असून या अंतर्गत देशभर युवकांचे प्रबोधनात्मक शिबिर आयोजित केले. याअंतर्गत स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समितीच्या आसामचे संयोजक म्हणूनही त्यांनी काम केले होते.