विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत वानखडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2023 09:53 PM2023-01-04T21:53:58+5:302023-01-04T21:57:00+5:30
Nagpur News अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने वर्धा येथे ४ व ५ फेब्रुवारी रोजी १७ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार व लेखक चंद्रकांत वानखडे यांची निवड करण्यात आली आहे.
नागपूर : वर्धा येथे होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने वर्धा येथे ४ व ५ फेब्रुवारी रोजी १७ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘गांधी का मरत नाही’ या पुस्तकाचे लेखक, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांची निवड करण्यात आल्याचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. नितेश कराळे जबाबदारी सांभाळणार आहेत. अ. भा. साहित्य संमेलनात दरवर्षी अपेक्षित चर्चा रंगण्याऐवजी साहित्यबाह्य चर्चा, जेवण, प्रवास, राहण्याची व्यवस्था अशाच चर्चा रंगत असून, याचसाठी राज्य शासन संमेलनासाठी ५० लाखांचा निधी देते का, असा प्रश्न परदेशी यांनी यावेळी उपस्थित केला. याच साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रीय पातळीवरील ज्येष्ठ साहित्यिकांचा अपमान करण्याची परंपरा आहे. याचाच विरोध म्हणून आम्ही विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करीत असतो. सोलापूर, मुंबईनंतर यंदा वर्धा येथे तिसऱ्यांदा थेट अ. भा. साहित्य संमेलनाच्या नगरीमध्येच हे संमेलन भरविण्यात येत आहे, असेही प्रा. प्रतिमा परदेशी यावेळी म्हणाल्या.
यावेळी मुख्य संयोजक डॉ. अशोक चोपडे, पदाधिकारी गुणवंत डकरे, प्रा. जनार्दन देवतळे, कपील थुटे, नंदकुमार वानखडे, विजय बाबुळकर, संजय शेंडे उपस्थित होते.
..............