चंद्रपूर, बल्लारशाहला सुंदर रेल्वेस्थानक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:02 AM2018-07-13T01:02:16+5:302018-07-13T01:04:29+5:30
भारतीय रेल्वेत आयोजित रेल्वेस्थानक सौंदर्यीकरण स्पर्धेत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील चंद्रपूर आणि बल्लारशा रेल्वेस्थानकाला भारतीय रेल्वेतील सर्वात सुंदर रेल्वेस्थानकाचा पुरस्कार जाहीर करून दिल्लीच्या रेल्वे भवनात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय रेल्वेत आयोजित रेल्वेस्थानक सौंदर्यीकरण स्पर्धेत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील चंद्रपूर आणि बल्लारशा रेल्वेस्थानकाला भारतीय रेल्वेतील सर्वात सुंदर रेल्वेस्थानकाचा पुरस्कार जाहीर करून दिल्लीच्या रेल्वे भवनात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ सोमेश कुमार श्रीवास्तव यांच्या नेतृत्वात चंद्रपूर, बल्लारशाह रेल्वेस्थानकाला ताडोबा जंगलावर आधारित मूर्ती आणि चित्राच्या माध्यमातून सुंदर बनविण्यात आले आहे. समारंभात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव, सौंदर्य, वनवैभव आणि जिल्ह्याची स्थानिक संस्कृती, लोककला अधोरेखित करणाऱ्या शासकीय कॉलेज आॅफ आर्टस् अँड डिझाईनचे फाईन आर्ट विभागप्रमुख विनोद मानकर आणि त्यांच्या चमूला प्रशस्तीपत्र आणि १० लाख रुपये देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून मध्य रेल्वेच्या रेल्वेस्थानकांचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच चंद्रपूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनाही त्यांच्या योगदानासाठी प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी, रेल्वे बोर्डाचे सदस्य रवींद्र गुप्ता, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी उपस्थित होते. नुकतील रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वे झोनमधून सुंदर रेल्वेस्थानकांची यादी मागविली होती. यात ११ झोनमधून ६२ अर्ज आले. त्यातून मध्य रेल्वेच्या चंद्रपूर, बल्लारशाची प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी या पुरस्कारासाठी ‘डीआरएम’ सोमेश कुमार आणि त्यांच्या चमूचे कौतुक केले आहे.