चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८८.१२ टक्के
By admin | Published: May 30, 2017 06:15 PM2017-05-30T18:15:55+5:302017-05-30T18:15:55+5:30
म. रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२वीचा निकाल मंगळवारी घोषित केला असून त्यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८८.१२ टक्के लागला आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : म. रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२वीचा निकाल मंगळवारी घोषित केला असून त्यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८८.१२ टक्के लागला आहे. निकालामध्ये मुली वरचढ ठरल्या आहेत. ९१.०४ टक्के मुली व ८५.७३ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.
यावर्षी जिल्ह्यातून २९ हजार ७९० विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज केला. त्यापैकी २९ हजार ७६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यावर २६ हजार २८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये नोंदणी करणारे १५ हजार ३०५ विद्यार्थी आणि १४ हजार ४८५ विद्यार्थिनींनी होत्या. त्यापैकी १५ हजार २८७ मुले व १४ हजार ४८० मुलींनी परीक्षा दिली. निकालामध्ये १३ हजार १०६ विद्यार्थी व १३ हजार १८३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांपेक्षा कमी मुलींनी परीक्षा दिली तरी उत्तीर्ण मुलींची संख्या अधिक आहे.
सर्वात कमी निकाल कला शाखेचा लागला आहे. सर्वाधिक विज्ञान शाखेचा ९६.८८ टक्के, वाणिज्य शाखा ८८.०१ टक्के, व्होकेशनल शाखा ८६.६४ टक्के आणि कला शाखेचा ८२.६६ टक्के निकाल लागला आहे. कला शाखेत १५ हजार २६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यावर १२ हजार ६१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेत १० हजार ५०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी १० हजार १८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत २ हजार ३०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून २ हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर व्होकेशनल शाखेत १ हजार ६९४ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ४६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.