चंद्रपूर तापले; पारा ४२ वर; नागपूरकर उकाड्याने त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2023 08:39 PM2023-04-12T20:39:41+5:302023-04-12T20:40:05+5:30
Nagpur News चंद्रपूरमध्ये पाऱ्याने ४२.२ अंशांवर उसळी घेतली असून, येथे राज्यात सर्वाधिक तापमानाची नाेंद झाली आहे.
नागपूर : नागपूर, गडचिराेली, बुलढाणा वगळता विदर्भातील सर्व जिल्ह्यातील कमाल तापमान बुधवारी ४० अंशांच्या पार पाेहोचले. चंद्रपूरमध्ये पाऱ्याने ४२.२ अंशांवर उसळी घेतली असून, येथे राज्यात सर्वाधिक तापमानाची नाेंद झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढचे दाेन दिवस पुन्हा विदर्भात ढगाळ वातावरण व विजांच्या कडकडाटाचा अंदाज वर्तविला आहे.
नागपुरात बुधवारी काहीसे ढगाळ वातावरण हाेते, पण उकाड्याने नागरिकांना त्रस्त केले. ढगांमुळे सूर्याचे चटके वाटत नसले तरी घाम मात्र निघत हाेता. पारा ०.४ अंशांने वाढून ३९.४ अंशांवर गेला. गडचिराेलीत सर्वात कमी ३७.६ अंशांची नाेंद करण्यात आली. बुलढाण्यात ताे ३८.४ अंशांवर हाेता. इतर सर्व जिल्ह्यांत मात्र तापमान वधारले. अकाेला, अमरावती, वर्धा, यवतमाळात तापमान ४१ अंशांवर पाेहोचले आहे. वाशिम व गाेंदियामध्ये ४० अंशांवर उसळी घेतली.
रात्रीच्या किमान तापमानात वाढ...
रात्रीचे किमान तापमानही वाढले आहे. नागपूर, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, वर्धा, यवतमाळात २४ अंशांवर नाेंद झाली. पारा वाढला तसा उकाडा अस्वस्थ करायला लागला आहे. दरम्यान, दि. १३ व १४ एप्रिल राेजी विदर्भात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानंतर उघाड हाेण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात ढगाळ वातावरण त्यापुढचे दाेन दिवस राहणार आहे.