चंद्रपूर मेडिकलला ‘एमसीआय’ची प्रतीक्षा!
By admin | Published: May 16, 2015 02:39 AM2015-05-16T02:39:15+5:302015-05-16T02:39:15+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी आठ वर्षांपासून रखडलेले मेडिकल कॉलेज येत्या सत्रांपासून सुरू होणार की नाही यावर संशय व्यक्त केला जात आहे.
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी आठ वर्षांपासून रखडलेले मेडिकल कॉलेज येत्या सत्रांपासून सुरू होणार की नाही यावर संशय व्यक्त केला जात आहे. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) मागील पाहणीत काढलेल्या त्रुटी दूर केल्यानंतरही त्याच्या पुनर्तपासणीसाठी एमसीआयची चमू आली नाही. परिणामी, चंद्रपूर मेडिकल महाविद्यालयाची मान्यता धोक्यात आली आहे.
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याच सत्रापासून सुरू करण्यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मार्च महिन्यात एमसीआयच्या चमूने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. परंतु या पाहणीत ३२३ खाटा असतानाही चमूने २७२ खाटाची नोंद केली व इतरही काही त्रुटी काढल्या. नियमानुसार मेडिकल कॉलेज सुरू करायला किमान ३०० खाटा असणे आवश्यक असते, परंतु चुकीच्या नोंदीमुळे या महाविद्यालयाला मान्यता देऊ नये, अशी शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात आली. याला घेऊन चंद्रपूर मेडिकल प्रशासनाने ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. सिव्हील हॉस्पिटलच्या ३०० वर असलेल्या खाटांचा अध्यादेशही एमसीआयकडे सादर केला. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत एमसीआयने दोन महिन्यात त्रुटी दूर करण्याची मुदत दिली. १५ मे पर्यंत एमसीआयची चमू येण्याची दाट शक्यता होती. यासाठी मेडिकल, मेयो व सुपर स्पेशालिटीमधील २२ वैद्यकीय शिक्षकांचा ताफा रोज चंद्रपूरसाठी रवाना होई, आणि तासाभराने परतही येई. गेल्या तीन आठवड्यांपासून ही कवायत सुरू होती. परंतु १५ मे उजाडूनही एमसीआयची चमू न आल्याने शंका उपस्थित केली जात आहे. विशेष म्हणजे, एमसीआयची चमू येणार यानिमित्ताने १४ मे रोजी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी चंद्रपूर मेडिकलला भेट दिली. आढवाही घेतला. परंतु त्यांनाही खाली हात परतावे लागले.
चंद्रपूर मेडिकल महाविद्यालयाला एमसीआय न्याय देत नसेल तर लोकप्रतिनिधींनी ही बाब रेटून धरण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहे. (प्रतिनिधी)