चंद्रपूर मेडिकलला मिळाले ‘डीन’
By admin | Published: August 21, 2015 03:27 AM2015-08-21T03:27:05+5:302015-08-21T03:27:05+5:30
आठ वर्षांपासून रखडलेले चंद्रपूरचे मेडिकल कॉलेज येत्या सत्रापासून सुरू होत आहे. या कॉलेजला पूर्णवेळ अधिष्ठाता (डीन) मिळावा ...
एस.एस. मोरे यांच्याकडे पदभार
नागपूर : आठ वर्षांपासून रखडलेले चंद्रपूरचे मेडिकल कॉलेज येत्या सत्रापासून सुरू होत आहे. या कॉलेजला पूर्णवेळ अधिष्ठाता (डीन) मिळावा म्हणून गेल्या वर्षीपासूनच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) प्रयत्न सुरू होते. अखेर गुरुवारी या पदासाठी तीन प्राध्यापकांच्या मुलाखती घेतल्यानंतर बालरोगतज्ज्ञ डॉ. एस.एस. मोरे यांची निवड करण्यात आली. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला आहे.
चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे काम पूर्णत्वास आले असून मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एमसीआय) निकषाप्रमाणे पदे भरती करणे सुरू आहे. यात खरी अडचण ठरत होते ते अधिष्ठाताचे पद. या कॉलेजचा भार नोडल अधिकारी म्हणून डॉ. प्रदीप दीक्षित यांच्यावर सोपविण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वी या रुग्णालयाच्या अधिष्ठातापदासाठी ज्येष्ठता यादीनुसार पात्र असलेल्या १० ते १२ प्राध्यापकांना याविषयी विचारणा करण्यात आली होती. परंतु पुण्याच्या मेडिकल कॉलेजसह इतर कॉलेजमधील पात्र उमेदवारांनी नकार दिला. चंद्रपूरला पूर्णवेळ अधिष्ठाता मिळत नसल्याने डीएमईआर अडचणीत आले होते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अखेर कठोर निर्णय घेत डीएमईआरने मेयोचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मधुकर प्रचंड, डॉ. ए.एन.केवलिया व डॉ. एस.एस. मोरे यांना गुरुवारी मुलाखतीला बोलविले. यात डॉ. मोरे यांच्याकडे चंद्रपूर मेडिकलचे अधिष्ठातापद सोपविण्यात आले. सोमवारी ते कार्यभार स्वीकारणार आहेत. डॉ. मोरे गेल्या दहा वर्षापासून यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बालरोग विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. मे २०१५ मध्ये त्यांची बदली नांदेड मेडिकलमध्ये झाली होती. डॉ. मोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)