चंद्रपूर वीज केंद्राने १० वर्षांचे वीज शुल्क हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 09:44 PM2020-03-12T21:44:48+5:302020-03-12T21:46:15+5:30
चंद्रपूर येथील औष्णिक वीज केंद्र मागील १० वर्षांपासून राज्य सरकारला ‘इलेक्ट्रिसिटी ड्युटी’ अदा करीत नाही. दहा वर्षांनंतर जेव्हा विद्युत निरीक्षकाने महावितरणच्या मुख्य अभियंत्यास नोटीस जारी करीत याचे कारण विचारले तेव्हा ही बाब उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चंद्रपूर येथील औष्णिक वीज केंद्र मागील १० वर्षांपासून राज्य सरकारला ‘इलेक्ट्रिसिटी ड्युटी’ अदा करीत नाही. दहा वर्षांनंतर जेव्हा विद्युत निरीक्षकाने महावितरणच्या मुख्य अभियंत्यास नोटीस जारी करीत याचे कारण विचारले तेव्हा ही बाब उघडकीस आली.
चंद्रपूर येथे महाजेनकोचे २९२० मेगावॅट क्षमतेचे औष्णिक वीज केंद्र आहे. येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी केंद्राजवळच ऊर्जानगर येथे रहिवासी कॉलनी तयार करण्यात आली आहे. ही कॉलनी नेहमीच रोषणाईने उजळलेली असते. विद्युत निरीक्षकाने जारी केलेल्या नोटीसमधून ही बाब उघडकीस आली आहे की, एप्रिल २०१० ते आतापर्यंत या केंद्राने इलेक्ट्रिसिटी ड्युटीसह वीज बिल भरलेले नाही. ‘इलेक्ट्रिसिटी ड्युटी’हे ते शुल्क आहे जे थेट राज्य सरकारच्या खात्यात जमा होते. विद्युत निरीक्षकाने याच शुल्कासाठी अनेकदा पत्रे लिहिली, परंतु कुठलाही पुढाकार घेण्यात आलेला नाही. इतकेच नव्हे तर यासंदर्भात माहितीसुद्धा देण्यात आली नाही. या नोटीसद्वारे निष्काळजीपणाबद्दल २४ टक्के व्याज का वसूल करण्यात येऊ नये, अशी विचारणाही केली नाही. दुसरीकडे महावितरणच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, महाजेनकोची वीज कंपनी खरेदी करते. त्याचे बिल कागदांवर अॅडजेस्ट होतात. रहिवासी कॉलनीत केंद्रातून उत्पादित विजेचा थेट पुरवठा केला जातो. हे प्रकरण २०१० पासून सुरू झाले. दुसरीकडे महावितरणचे म्हणणे आहे की, महाजेनकोने एच.टी. कनेक्शनची मागणी केली आहे. यावर त्यांना सेक्युरिटी डिपॉझिटची डिमांड नोट देण्यात आली. परंतु केंद्राने डिपॉझिट भरले नाही. त्यामुळे कनेक्शन देता आले नाही. परिणामी वीज बिल जारी झाले नाही. यामुळे राज्य सरकारला मागील दहा वर्षांपासून इलेक्ट्रिसिटी ड्युटीचे नुकसान होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य नागरिकाने जर एक महिन्याचे वीज बिल भरले नाही तर
महावितरणचे कर्मचारी वीज कनेक्शन कापण्यासाठी पोहोचतात. आता वीज केंद्रच इलेक्ट्रिसिटी ड्युटी हडपीत आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणातील दोषींवर काय कारवाई होईल, याकडे लक्ष लागले आहे.
मार्ग काढण्याचा प्रयत्न
दोन्ही कंपन्यांमध्ये बुक अॅडजेस्टमेंट असते. विद्युत निरीक्षकाच्या नोटीसबाबत दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा सुरू असून, मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातोय.
सुनील देशपांडे
महावितरणचे मुख्य अभियंता