Vidhan Parishad Election Result: नागपूर विधान परिषद निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळेंचा एकतर्फी विजय, महाविकास आघाडीला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 09:43 AM2021-12-14T09:43:27+5:302021-12-14T09:48:33+5:30
Vidhan Parishad Election Result: राज्यातील संपूर्ण राजकी वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. येथील भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसने पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव केला.
नागपूर - राज्यातील संपूर्ण राजकी वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. येथील भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसने पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव केला. एकूण ५५४ मतदार असलेल्या या मतदानामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस समर्थित मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली. दरम्यान, बावनकुळे यांच्या अधिकृत विजयाची घोषणा बाकी आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारली होती. दोन वर्षांच्या राजकीय विजयनावासानंतर भाजापाने आता नागपूर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसने आधी छोटू भोयर यांना उमेदवारी दिली होती. तर नंतर ऐनवेळी उमेदवार बदलून मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला होता. मात्र त्याचा काँग्रेसला फायदा मिळाला नाही.
या मतदानासाठी भाजपाकडे ३१८ मते होती. मात्र बावनकुळे यांना प्रत्यक्षात ३६२ मते मिळाली. भाजपा उमेदवार बावनकुळेंना त्यांच्याकडे असलेल्या मतांच्या कोट्यापेक्षा तब्बला ४४ मते अधिक मते मिळातील. म्हणजेच महाविकास आघाडीची ४४ मते फोडण्यात भाजपाला यश आले. तर मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार छोटू भोयर यांना केवळ एक मत मिळाले.
दरम्यान, या विजयानंतर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, मी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत. मला मतदान करणाऱ्या मतदारांचे आभार मानतो. काँग्रेसचा आज झालेला पराभव हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पराभव आहे. त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.