'शरद पवारांनीच शेतकऱ्यांवर सर्वाधिक अन्याय केला, उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती ढासळली'; चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र
By योगेश पांडे | Updated: April 21, 2024 12:24 IST2024-04-21T11:59:16+5:302024-04-21T12:24:39+5:30
शरद पवार कृषीमंत्री असताना सर्वात जास्त शेतकऱ्यांवर त्यांनीच अन्याय केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे शरद पवारांवर टीकास्त्र

Sharad Pawar, Chandrashekhar Bawankule
नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परत एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उद्धवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना महाराष्ट्र कृषी क्षेत्रात दहाव्या क्रमांकावर गेला होता. शरद पवार यांचा इतिहास पाहिला तर सर्वात जास्त शेतकऱ्यांवर त्यांनीच अन्याय केला. त्यांनी शेतकऱ्यांचा पुळका दाखवू नये, या शब्दांत त्यांनी टीका केली. रविवारी ते पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.
शरद पवार व कॉंग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांचा जनाधार संपविला. जर राज्यातील जनतेचे सर्वेक्षण केले तर महाराष्ट्रातील लायक व्यक्तीच्या यादीत टॉपवर देवेंद्र फडणवीस हे असतील. तर सर्वात नालायक व्यक्तींमध्ये सर्वात टॉपवर उद्धव ठाकरे दिसतील. उद्धव ठाकरे यांची सभा घेण्यास कुणीच तयार नाही. उद्धव यांच्या सभेला लोक येण्यास तयार नाहीत. या लोकसभा निवडणूकीनंतर उद्धव ठाकरे घरी बसतील, असा दावा बावनकुळे यांनी केला.
महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचा इतिहास बघितला तर निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हेच ठरतील. त्यांची मानसिक स्थिती ढासळली असून ते मनोरुग्णासारखे वागतात. त्यांना लवकरच इस्पितळात दाखल करण्याची गरज आहे. आदित्य ठाकरे हे एका मतदारसंघात ते हवेत निवडून आले. त्यांची मंत्रीपदाची पात्रता होती का असा सवाल त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांना विकासावर बोलता येत नाहीत तेव्हा जनतेला संभ्रमात टाकत कुणीतरी लिहून दिलेली स्क्रीप्ट वाचायची हेच त्यांचे काम आहे. त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला.