पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात चंद्रसेन भिसे, शोभा भरडे यांना अटकपूर्व जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:11 AM2021-08-28T04:11:47+5:302021-08-28T04:11:47+5:30
नागपूर : देशविदेशातील हजारो ग्राहकांना फसविल्याचा आरोप असलेल्या पॅनकार्ड क्लब कंपनीचे संचालक चंद्रसेन भिसे व शोभा भरडे यांना मुंबई ...
नागपूर : देशविदेशातील हजारो ग्राहकांना फसविल्याचा आरोप असलेल्या पॅनकार्ड क्लब कंपनीचे संचालक चंद्रसेन भिसे व शोभा भरडे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. या कंपनीने सुमारे ७५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा अंदाज स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सादर प्रतिज्ञापत्रात व्यक्त केला आहे.
न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हा निर्णय दिला. या घोटाळ्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. नागपूरमध्ये संबंधित आरोपींविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, ४०६, ४०९, ३४ व एमपीआयडी कायद्यातील कलम ३ अंतर्गत एफआयआर नाेंदविला आहे. प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेद्वारे केला जात आहे. पॅनकार्ड कंपनीचे देशविदेशात एकूण ३० हॉटेल्स आहेत. याशिवाय कंपनी रिसॉर्ट, माहिती तंत्रज्ञान, मालमत्ता विकास, बांधकाम इत्यादी क्षेत्रातही सक्रिय होती. दरम्यान, कंपनीने विविध गुंतवणूक योजना जाहीर करून ग्राहकांची फसवणूक केली. कंपनीचे एक कार्यालय गणेशपेठमध्ये होते. आरोपींच्या वतीने ॲड. समीर सोनवणे व ॲड. अमित ठाकूर यांनी बाजू मांडली. आरोपी वयोवृद्ध असून त्यांचा कंपनीच्या व्यवस्थापनाशी काहीही संबंध नव्हता. त्यांनी गुंतवणूक योजना जाहीर केल्या नाहीत. आतापर्यंत कंपनीची २ हजार ७९२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ३३४ बँक खाती गोठविण्यात आली आहेत. तसेच, विविध संपत्ती विकून ११० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेत आरोपींना दिलासा दिला.