ज्यांनी कधी गावातला विकास पाहिला नाही, त्यांना विदर्भाच्या समस्या..; बावनकुळेंचा विरोधकांना खोचक टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2022 11:28 AM2022-12-10T11:28:52+5:302022-12-10T12:19:44+5:30
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांवर साधला निशाणा
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या ११ डिसेंबररोजी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपुरात प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त सुरू असलेल्या तयारीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पाहणी व आढावा घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कार्यक्रमानिमित्त आज (दि. १०) नागपुरात पत्रपरिषद घेत माहिती दिली.
समृद्धी महामार्ग होऊ नये म्हणून एका वर्गाचे प्रयत्न सुरू होते. अनेकांनी आडकाठी टाकली, विघ्न आणण्यांच काम केलं पण देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे या महामार्गाचं काम यशस्वीपणे पार पडलं. ज्यांनी कधी गावातला विकास पाहिला नाही, विकास हा शब्दच ऐकला नाही, त्यांना विदर्भाच्या समस्या काय कळणार? सोन्याच्या चमच्याने बादामाचा ज्यूस पिऊन मोठे झालेल्यांना काय माहिती विदर्भ, मराठवाड्याचा विकास.. असा खोचक टोला त्यांनी विरोधकांना लगावला. ही राजकीय पत्रपरिषद नाही त्यामुळे यावर आपण आत्ता जास्त बोलणार नाही, आम्ही योग्य वेळी बोलू असे बावनकुळे म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्ग, वंदे भारत रेल्वे तसेच नागपूर मेट्रो फेस-२ च्या लोकार्पण सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जनतेमध्ये उत्साह आहे. सर्व नागपूरकरांनी मोठ्या संख्येने उत्साहाने पंतप्रधानांचे स्वागत करावे व कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. यासह इतर जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. समृद्धी महामार्गामुळे विदर्भ, मराठवाड्याच्या विकासाला गती मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सीमा भागात तणाव निर्माण करून मार्ग निघणार नाही
कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलायचं ते बोलू देत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून त्यावरील निकालानंतरच काय ते स्पष्ट होईल. मात्र, जाळपोळ, आणि तणावाचे वातावरण निर्माण करून मार्ग निघणार नाही. त्यामुळे कोणीही भडकावू वक्तव्य करून प्रकरण आणखी चिघळवण्याचं टाळावं, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.