कोरोनावरून चंद्रशेखर बावनकुळेंचा नितीन राऊतांवर नेम; म्हणाले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 11:45 AM2022-06-08T11:45:50+5:302022-06-08T11:53:45+5:30
दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांमुळे नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली. त्यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्षेप घेतला आहे.
नागपूर : शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या व रोखण्यासाठी होत असलेले उपाय यावरून आजी- माजी पालकमंत्री पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिल्लीहून आलेल्या प्रवाशांमुळे नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे वक्तव्य करताच चारधामहून परत येणाऱ्या भाविकांमुळे शहरात कोरोना वाढतोय, असे म्हणायचे आहे का, याचा पालकमंत्र्यांनी खुलासा करण्याची मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे.
दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांमुळे नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी व्यक्त केली. सोमवारी आढळलेल्या ३७ रुग्णांपैकी जास्तीत जास्त रुग्ण हे दिल्लीहून आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या वक्तव्यावर मंगळवारी बावनकुळे यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले की, नेमके यावेळी विदर्भ व नागपुरातील भाविक चारधाम यात्रा करून परतत आहेत. या यात्रेकरूंमुळे नागपुरात कोरोना पसरत आहे, असे पालकमंत्री राऊत यांना म्हणायचे आहे का, याचा खुलासा करावा.
यावर पालकमंत्री राऊत म्हणाले, मंगळवारीही नागपुरात शहरात कोरोनाचे ९ रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. उपाययोजना आवश्यक आहे. रेल्वेस्थानकावर चाचण्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागपूरकरांच्या सुरक्षेसाठी हे करणे आवश्यक असल्याचे सांगत बावनकुळे यांच्या टीकेला उत्तर देणे त्यांनी टाळले.