वागणूक बदलवा, अन्यथा कर्फ्यू अटळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 08:05 PM2020-07-23T20:05:45+5:302020-07-23T21:18:41+5:30

शहरात साडेतीन महिन्यात ४५० कोरोनाबाधित होते, तर ११ जणांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर दोन हजार बाधित झाले, तर ३८ जणांचा मृत्यू झाला. सामान्य जीवन जगण्याची मुभा दिली, परंतु कोविड-१९ च्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. वागणूक व सवयी बदलाव्या लागतील, नवीन जीवनपद्धती स्वीकारावी लागेल. अन्यथा कर्फ्यूसह लॉकडाऊन लागू करावा लागेल. यात जीवनावश्यक वस्तूही मिळणार नाही, असे इशारावजा आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केले.

Change behavior, otherwise curfew is inevitable! | वागणूक बदलवा, अन्यथा कर्फ्यू अटळ!

वागणूक बदलवा, अन्यथा कर्फ्यू अटळ!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात साडेतीन महिन्यात ४५० कोरोनाबाधित होते, तर ११ जणांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर दोन हजार बाधित झाले, तर ३८ जणांचा मृत्यू झाला. सामान्य जीवन जगण्याची मुभा दिली, परंतु कोविड-१९ च्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. वागणूक व सवयी बदलाव्या लागतील, नवीन जीवनपद्धती स्वीकारावी लागेल. अन्यथा कर्फ्यूसह लॉकडाऊन लागू करावा लागेल. यात जीवनावश्यक वस्तूही मिळणार नाही, असे इशारावजा आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केले.
अनेक जण म्हणतात लॉकडाऊन लागू करू नये, पण ते स्वत: नियम पाळत नाही. मास्क वापरले तर ९० टक्के संसर्ग रोखता येईल. परंतु अजूनही २० ते ४० टक्के लोक मास्क वापरत नाहीत, फिजिकल डिस्टन्स पाळले जात नाही. दुकानात पाचहून अधिक लोकांना मनाई आहे. परंतु २० ते २५ लोक दिसतात. नियम पाळावेत म्हणून दुकानदारांना १० हजारापर्यंत दंड केला. यात सुधारणा झाली नाही तर ५० हजार ते १ लाखापर्यंत दंड केला जाईल. दुकाने बंद केली जातील. परवानाही रद्द होईल. नियमांचे पालन केले तर ही वेळ येणार नाही, कर्फ्यू, लॉकडाऊन लावावा लागणार नाही. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले.

जेलमध्ये पाठविण्याची वेळ आणू नका
मास्क वापरा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, फिजिकल डिस्टन्स पाळा, साबणाने वारंवार हात धुवा, असे आवाहन करतानाच व्यापाऱ्यांनी समूह व विषम नियमाचे व फिजिकल डिस्टन्सचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न केल्यास जेलमध्ये जावे लागेल, परंतु अशी वेळ आणू नका, असेही मुंढे म्हणाले.

प्रश्न सर्वांचेच पण नाईलाज
हातावर पोट भरणारे लोक आहेत. चहाटपरी, हातठेले, हॉकर्स व्यवसायासाठी परवानगी मागतात. प्रश्न सर्वांचेच आहेत, परंतु केंद्र व राज्य सरकारचे दिशानिर्देश पाळणे आवश्यक आहे. रेस्टॉरंटला पार्सलची परवानगी दिली. परंतु गर्दी होत आहे. संचारबंदी लागू केली तर गरिबांचे कंबरडे मोडणार आहे. शंभर टक्के नागरिकांनी नियम पाळले तर ही वेळ येणार नाही,असेही तुकाराम मुंढे म्हणाले.

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू नका
ऑगस्ट महिना सण-उत्सवांचा आहे. ईद, गणेशोत्सव, रक्षाबंधन असे सण येत आहेत. संसर्ग टाळण्यासाठी गणेशोत्सव सार्वजनिक साजरा करू नका, वैयक्तिक स्तरावर साजरा करा. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्या, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले.

खासगी हॉस्पिटल सज्ज ठेवा
कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर लपवून ठेवू नका. वेळीच नियंत्रण कक्षाला कळवा, शासकीय रुग्णालयात उपचार घ्या. स्वत:चा व कुटुंबाचा जीव वाचवा. खासगी रुग्णालयांनीसुद्धा कोविड रुग्णांची माहिती देणे आवश्यक आहे. शहरातील बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता, खासगी रुग्णालयांनी आपली रुग्णालये कोविड सेंटरसाठी सज्ज ठेवावीत, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले.

कर्फ्यू लावण्यापूर्वी शंभरवेळा विचार करा - संदीप जोशी
मध्यमवर्गीय दुकानदारांची परिस्थिती बिकट आहे. याचा विचार करता नागपूर शहरात कर्फ्यू ,लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी मनपा आयुक्तांनी शंभरवेळा विचार करावा, अशी विनंती महापौर संदीप जोशी यांनी केली आहे. नागपूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. परंतु यात ३० टक्के ग्रामीण भागातील आहेत. तीनदा लॉकडाऊननंतरही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कर्फ्यूमुळे संख्या कमी होईल हे सत्य नाही. बाधितांची संख्या कमी करायची असेल तर सर्वांनी एकत्र काम करावे लागेल. नियमाचे काटेकोर पालन करावे लागेल, असे जोशी म्हणाले.

Web Title: Change behavior, otherwise curfew is inevitable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.