काँग्रेसमधील बदलामुळे राजकारणाचे वारे बदलतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:11 PM2019-07-15T12:11:02+5:302019-07-15T12:12:01+5:30
श्रम करण्यास आम्ही मागे नाही. मेहनत करू, दिलेली जबाबदारी पूर्णपणे पेलून पक्षाला सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. राज्यात ताठर मानेने पक्ष कसा उभा राहील, यासाठी प्रयत्न करू, असे मत काँग्रेसचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष नितीन राऊत यांनी येथे व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा होती. राहुल गांधी यांच्या मान्यतेने बाळासाहेब थोरात यांची अध्यक्षपदी तर माझ्यासह पाच कार्यकारी अध्यक्षांची निवड करण्यात आली. कोणताही बदल हा देश, संघटन आणि खेळ यासाठी काहीतरी देऊन जातो. या बदलामुळे राज्यातील राजकारणाचे वारे बदलतील. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीसाठी चांगली संधी आहे. श्रम करण्यास आम्ही मागे नाही. मेहनत करू, दिलेली जबाबदारी पूर्णपणे पेलून पक्षाला सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. राज्यात ताठर मानेने पक्ष कसा उभा राहील, यासाठी प्रयत्न करू, असे मत काँग्रेसचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष नितीन राऊत यांनी येथे व्यक्त केला.
काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशिवाय पाच कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये माजी मंत्री नितीन राऊत यांचाही समावेश आहे. राज्याचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी रविवारी सर्वप्रथम दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांना अभिवादन केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना नितीन राऊत म्हणाले, पाच कार्यकारी अध्यक्षांमुळे कुठलाही वाद होणार नाही. उलट काँग्रेसला मजबूत करण्यासाठी सर्व मिळून काम करतील. राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे आमची लढाई आरएसएससोबत आहे. त्यादिशेने आम्ही सर्व एकजुटीने लढा देऊ. काँग्रेसच्या अंतर्गत वादाबाबत विचारले असता काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
आम्ही आमचे वाद विसरून एकत्रपणे लढा देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अनिल नगरारे, जुल्फीकार अली भुट्टो, संजय दुबे, साहेबराव सिरसाट आदी उपस्थित होते.