हायकोर्टाच्या रोस्टरमध्ये बदल
By admin | Published: December 26, 2014 12:49 AM2014-12-26T00:49:07+5:302014-12-26T00:49:07+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या रोस्टरमध्ये नियमित प्रक्रियेनुसार बदल करण्यात आला आहे. नागपूर खंडपीठात यापुढे नवीन आदेशापर्यंत चार युगलपीठे कार्य करणार आहेत. नवीन रोस्टर ५ जानेवारीपासून लागू होईल.
नागपुरात चार युगलपीठे : ५ जानेवारीपासून अंमलबजावणी
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या रोस्टरमध्ये नियमित प्रक्रियेनुसार बदल करण्यात आला आहे. नागपूर खंडपीठात यापुढे नवीन आदेशापर्यंत चार युगलपीठे कार्य करणार आहेत. नवीन रोस्टर ५ जानेवारीपासून लागू होईल.
नवीन रोस्टरमध्ये न्यायमूर्तींसह त्यांच्या कामकाजातही फेरबदल करण्यात आला आहे. त्यानुसार नागपूर खंडपीठातील न्यायमूर्तीद्वय अनुप मोहता व पुखराज बोरा यांच्या युगलपीठाकडे २०१५ मध्ये दाखल जनहित याचिका व इतर न्यायपीठाला न दिलेल्या दिवाणी रिट याचिका, न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व नितीन सांबरे यांच्याकडे ३१ डिसेंबर २०१४ पर्यंतच्या सर्व जनहित याचिका, कौटुंबिक न्यायालय अपील, लेटर्स पेटेन्ट अपील, टॅक्स अपील, फर्स्ट अपील, न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अशोक भंगाळे यांच्या युगलपीठाकडे १९९८ पर्यंतच्या, २००० ते २००५, २०११ ते २०१३ व ३० जून २०१४ पर्यंतच्या दिवाणी रिट याचिका, तर न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांच्या युगलपीठाकडे सर्व फौजदारी याचिकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
एकलपीठामध्ये न्यायमूर्ती प्रसन्न वराळे हे फौजदारी अपील, जामीन व अटकपूर्व जामीन अर्ज, न्यायमूर्ती रवी देशपांडे हे २०००, २००२, २००४, २००६, २००८ व १ सप्टेंबर २०१४ पुढील दिवाणी रिट याचिका, २०१० पर्यंतच्या सेकंड अपील, न्यायमूर्ती सुनील शुक्रे फौजदारी रिट याचिका, सीआरपीसी कलम ४८२ अंतर्गतचे अर्ज, २०१० पर्यंतच्या फौजदारी अपील, न्यायमूर्ती झेड. ए. हक फर्स्ट अपील, अपील अगेन्स्ट आॅर्डर, दिवाणी पुनर्विचार अर्ज, एमसीए, तर न्यायमूर्ती अतुल चांदूरकर हे २००१, २००३, २००५, २००७, २००९, २०१३ व १ जानेवारी २०१४ ते ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंतच्या दिवाणी रिट याचिका व २०११ पासून पुढे दाखल सेकंड अपीलचे कामकाज पाहतील. (प्रतिनिधी)