ग्रामपंचायतींमध्ये परिवर्तनाची कास, नवख्यांच्या हातात दिला कारभार
By प्रसाद आर्वीकर | Published: December 20, 2022 05:25 PM2022-12-20T17:25:14+5:302022-12-20T17:25:54+5:30
अनेक गावांमध्ये प्रस्थापितांना धक्का देत मतदारांनी नवख्यांच्या हातात सत्ता दिली
नांदेड : जिल्ह्यातील १६० ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले असून, एक एक निकाल हाती येत आहेत. किनवट तालुक्यात मात्र अनेक गावांमध्ये प्रस्थापितांना धक्का देत मतदारांनी नवख्यांच्या हातात सत्ता दिली आहे.
जिल्ह्यात किनवट तालुक्यात सर्वाधिक ५३ ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली. त्यामुळे या तालुक्यावर जिल्ह्याचे लक्ष वेधले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत २४ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून, त्यात चिखली ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीत मागील पंधरा ते २० वर्षांपूर्वीची सत्ता उलटून लावत ग्रामस्थांनी परिवर्तनाच्या बाजूने कौल दिला आहे. सर्वच्या सर्व नव्या उमेदवारांना या गावात संधी देण्यात आली आहे. एकंदर निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादीने ८ तर भाजपने १० ग्रामपंचयातींवर दावा सांगितला आहे. तर ग्रामस्थ मात्र आम्ही पक्ष पाहून मतदान केले नाही. सर्व पक्षाचे उमेदवार निवडून दिल्याचे सांगत आहेत. लोहा तालुक्यातही ग्रामस्थांनी परिवर्तनाची कास धरली आहे. तालुक्यात नांदगाव, चिंचोली व कांजाळा या ठिकाणी ग्रामस्थांनी नवख्यांच्या हातात सत्ता दिली आहे.