शेतकऱ्यांना बियाणे मिळण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांत बदल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:08 AM2021-05-19T04:08:53+5:302021-05-19T04:08:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : खरीप हंगामात कमी कालावधीचे वाण लावण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून त्यांच्यात जाणीव जागृती करण्याची गरज ...

Change the lockdown rules for farmers to get seeds | शेतकऱ्यांना बियाणे मिळण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांत बदल करा

शेतकऱ्यांना बियाणे मिळण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांत बदल करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : खरीप हंगामात कमी कालावधीचे वाण लावण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून त्यांच्यात जाणीव जागृती करण्याची गरज आहे. जिल्ह्यात खरिपासाठी गुणवत्तापूर्ण बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्याचे नियोजन करण्यासोबतच शेतकऱ्यांना वेळेत बियाणे उपलब्ध होण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमामध्ये आवश्यक तो बदल करण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी दिले. खरीप हंगाम तयारी नियोजन व आढाव्यासंदर्भातील ऑनलाइन बैठकीदरम्यान ते बोलत होते.

पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला हजर होते. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, कृषी सभापती तपेश्वर वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर हेदेखील उपस्थित होते. पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी, अडचणी असतात. त्या सोडविण्यासाठी विमा कंपनीने जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचे आदेश नितीन राऊत यांनी दिले. सोयाबीन बियाण्यासाठी महाबीज व खासगी कंपन्यांकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना बियाणे सुलभतेने उपलब्ध करून द्यावे. तसेच शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेचे बियाणे, खते मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रांची तपासणी करण्याची सूचना त्यांनी कृषी विभागाला केली. विद्युत जोडणीकरिता पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना तातडीने वीज जोडणी देण्याचे आदेश त्यांनी महावितरणला दिले.

भरारी पथकांमार्फत लक्ष ठेवा

गैरप्रकार व शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी बियाणे, खते, कीटकनाशके यांची उपलब्धता, पुरवठा याबाबत योग्य देखरेख ठेवणे आवश्यक आहे. भरारी पथकाच्या मार्फत संनियत्रण करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. खरीप हंगामात जुलै, ऑगस्ट दरम्यान युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे जिल्ह्याला जास्तीत जास्त युरिया बफर स्टॉक मिळण्याकरीता पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी कोरोनानंतरच्या कालावधीत जास्तीत जास्त कर्ज मेळावे आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली.

Web Title: Change the lockdown rules for farmers to get seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.