आम्ही दिलेला शब्द पाळतो म्हणून राज्यात सत्ताबदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2022 10:08 PM2022-12-19T22:08:53+5:302022-12-19T22:09:23+5:30
Nagpur News आम्ही दिलेला शब्द पाळतो. त्यामुळे राज्यात सत्ताबदल घडविण्यात आला व सर्वसामान्य जनतेच्या मनातील सरकार स्थापन करण्यात आले, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच्या सरकारवर वार केला.
नागपूर : आम्ही दिलेला शब्द पाळतो. त्यामुळे राज्यात सत्ताबदल घडविण्यात आला व सर्वसामान्य जनतेच्या मनातील सरकार स्थापन करण्यात आले, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच्या सरकारवर वार केला.
मराठा समाजाच्या वतीने सोमवारी रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अंजनगाव सुर्जी येथील श्रीनाथ पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार प्रवीण दटके, मराठा समाजाचे नेते राजे मुधोजी भोसले, राजे संग्रामसिंह भोसले, शिरीष राजेशिर्के, नरेंद्र मोहिते, दिलीप धंद्रे, दीपक देशमुख, आदी उपस्थित होते.
राज्यात सत्ताबदल घडविण्यासाठी ५० आमदार, १३ खासदार व अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी साथ दिली. मला राजकीय पार्श्वभूमी नाही. असे असताना केवळ सर्वांनी दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर मुख्यमंत्री झालो. मराठा समाजाचा विकास करण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी सतत प्रयत्न करेन, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे दोघेही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत, असे मत व्यक्त केले. शिवाजी महाराज श्रीराम व श्री कृष्ण यांच्या रीती-नितीने चालत होते. हे दोघेही त्याच रीती-नितीचे पालन करताहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनाही कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले होते. परंतु, ते काही कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी आयोजकांना पत्र पाठवून कार्यक्रमाकरिता शुभेच्छा दिल्या.
मराठा समाजाच्या विकासाकडे सरकारचे लक्ष - फडणवीस
मराठा समाजाच्या विकासाकडे राज्य सरकारचे लक्ष आहे. त्यांच्या १२ मागण्या पूर्ण करण्यासाठी मी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे वकिली करेन. सरकारने मराठा समाजाच्या विकासाकरिता विविध योजना सुरू केल्या आहेत. समाजातील दोन लाख तरुणांना उद्योजक करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीही सरकार गंभीर आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.