इतवारी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘महान त्यागी बाबा जुमदेवजी रेल्वे स्थानक’ ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2023 07:45 PM2023-01-20T19:45:24+5:302023-01-20T19:46:02+5:30
इतवारी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘महान त्यागी बाबा जुमदेवजी रेल्वे स्थानक इतवारी, नागपूर’ असे ठेवावे, अशी मागणी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली.
नागपूर :
इतवारी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘महान त्यागी बाबा जुमदेवजी रेल्वे स्थानक इतवारी, नागपूर’ असे ठेवावे, अशी मागणी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली. रेल्वेच्या बिलासपूर झोनची बैठक शुक्रवारी विभागीय रेल्वे कार्यालयात पार पडली. या बैठकीत खासदार तुमाने यांनी ही मागणी केली.
नागपूर विभागातील रेल्वेशी संबंधित प्रलंबित कामे आणि अडचणी तसेच नागरिकांच्या मागण्याच्या अनुषंगाने या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. बैठकीला खासदार सुनील मेंढे, खासदार बाळू धानोरकर, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोककुमार, व्यवस्थापक मनिंदर उप्पल आणि रेल्वेचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी रेल्वे प्रवाशांशी संबंधित समस्यांचा पाढा वाचून लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांपुढे अनेक मागण्या नोंदविल्या.
नागपूर आणि नागभीड रेल्वे मार्गाचे काम तातडीने करावे, नागपूर - रिवा गोंडवाना एक्स्प्रेसला कामठी येथे दोन मिनिटांचा थांबा देण्यात यावा, रामटेक कन्हान रेल्वे मार्गाचा कल्व्हर्ट लहान असल्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे हे दूषित पाणी नागरिकांच्या घरात जाते आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. याबाबतची संपूर्ण जबाबदारी रेल्वेची असूनही रेल्वेचे अधिकारी पालिकेकडे बोट दाखवून टाळाटाळ करतात. आमडी साटक रेल्वे मार्गवरील क्रॉसिंगपासून अंडरपास तयार व्हावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
याशिवाय कोरोनामुळे बंद करण्यात आलेली नागपूर - डोंगरगड मेमू पॅसेंजर गाडी पुन्हा सुरू करावी. महाराष्ट्र एक्स्प्रेसला निमखेडा (तरसा) स्थानकावरून जाते, निमखेडा (तारसा)मध्ये एनटीपीसी आणि अल्ट्राटेकसारख्या मोठ्या कंपन्या आहेत, आरोली, कोदामेंढी, तारसा, चाचेर येथील अनेक मजूर आणि स्थलांतरित या गाडीने प्रवास करतात. त्यामुळे नागपूर जाणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसला निमखेडा (तारसा) स्थानकावर थांबा द्यावा, आदी मागण्याही या बैठकीत रेटण्यात आल्या. भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील विविध मागण्यांच्या संबंधानेही बैठकीत मंथन झाले.
नागपूर-कोल्हापूरला ‘श्री विठ्ठल रुख्मिणी एक्स्प्रेस’ नाव द्या
भारताच्या मध्यस्थानी असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावरून रोज १६० ते १६५ रेल्वे गाड्या धावतात. येथून नागपूर - कोल्हापूर ही द्विसाप्ताहिक गाडीही जाते. या गाडीला ‘श्री विठ्ठल रुख्मिणी एक्स्प्रेस’ नाव द्यावे, अशी मागणीही बैठकीत लोकप्रतिनिधींनी केली.