सहकार कायद्यात बदल करणार
By Admin | Published: October 3, 2015 02:53 AM2015-10-03T02:53:55+5:302015-10-03T02:53:55+5:30
सहकार चळवळीच्या विकासाकरिता बाधक ठरत असलेल्या सहकार कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्याची ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
नितीन गडकरी : नचिकेत गौरव पुरस्काराचे वितरण
नागपूर : सहकार चळवळीच्या विकासाकरिता बाधक ठरत असलेल्या सहकार कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्याची ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी नचिकेत गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम उत्तर अंबाझरी मार्गावरील आयएमए सभागृह येथे पार पडला. सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मराठे देखील प्रमुख अतिथी होते. गडकरी यांनी सहकार चळवळीचे महत्त्व, सहकार चळवळी पुढील जागतिक आव्हाने, सहकार चळवळीतील गटबाजी इत्यादी मुद्यांवर मार्गदर्शन केले. राज्यात सहकार चळवळीने उल्लेखनीय कार्य केले आहे. सहकार संस्थांनी दिलेल्या कर्जामुळे अनेक साखर कारखाने तग धरून आहेत.
गरिबांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी सहकार चळवळ समृद्ध होणे आवश्यक आहे. परंतु, विश्वसनीयता टिकवून ठेवली तरच, सहकार चळवळ वाढू शकते. गुंतवणूकदारांना घोटाळ्याचा जराही संशय आल्यास होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागत नाही. विश्वास गमावल्यामुळे उत्तर प्रदेश व बिहारमध्ये सहकार चळवळीचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. येणारा काळ सहकार चळवळीसाठी आव्हानात्मक आहे. जागतिक पतसंस्थांमुळे व्याजदरात आमूलाग्र घट होऊ शकते. अशावेळी सहकारी संस्था व राष्ट्रीय बँकांनाही स्वत:च्या पतधोरणाचा विचार करावा लागणार आहे. सहकारी संस्थांनी स्पर्धेत टिकण्यासाठी ताकद व कमकुवत बाबींचा शोध घ्यावा. संस्थांतील गटबाजी समूळ नष्ट करावी. सर्वांनी मिळून विकासाकरिता कार्य करावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.
मराठे म्हणाले, गांधी समितीने सहकारी संस्थांना कंपनीत परिवर्तित करण्याची शिफारस केली आहे. हा सहकार चळवळ संपविण्याचा घाट आहे.
यामुळे ही शिफारस लागू करण्यात येऊ नये. सध्या खासगीकरण जोरात सुरू असले तरी हा कोणत्याही समस्येवरचा उपाय ठरू शकत नाही. गेल्या २५ वर्षांत सहकार चळवळ कमकुवत झाली आहे. देशाच्या उत्पन्नातील सहकारी संस्थांचे योगदान कमी झाले आहे. सहकार चळवळीला नवसंजीवनी देण्यासाठी सहकार कायद्यात बदल करणे आवश्यक आहे.
नचिकेत प्रकाशनतर्फे सर्वोत्तम अहवाल व सर्वोत्तम सेवा कार्य या दोन गटात नागरी बँका व सहकारी संस्थांना दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सीए जयंत मोडक व प्राचार्य जगदीश किल्लोळ यांचा सत्कार करण्यात आला. प्रकाशनचे अनिल सांबरे व्यासपीठावर उपस्थित होते.(प्रतिनिधी)