अभियांत्रिकीच्या प्रवेशप्रक्रियेमध्ये यंदापासून बदल
By admin | Published: June 2, 2016 03:13 AM2016-06-02T03:13:25+5:302016-06-02T03:13:25+5:30
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाच्या नावाखाली अनेकदा महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाते.
प्रवेशाअगोदर विद्यार्थ्यांना करावी लागणार नोंदणी : आवडत्या महाविद्यालयांत प्रवेशाच्या चार संधी
नागपूर : व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाच्या नावाखाली अनेकदा महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाते. ही बाब लक्षात घेता ‘डीटीई’ने (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) अभियांत्रिकीसोबतच इतरही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेच्या नियमांत बदल केले आहेत. व्यवस्थापन कोट्यातील जागांवरील प्रवेशातदेखील बदल झाला आहे. नव्या बदलांसह प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत व्यवस्थापन कोट्यातील जागांवर ‘डीटीई’च्या सुविधा केंद्रात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालय प्रवेश देऊ शकणार आहेत. विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी अडचण येऊ नये यासाठी ‘एमएचटी-सीईटी’चे निकाल येण्याअगोदरच ही प्रक्रिया सुरू झाली होती. १५ जूनपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.
विद्यार्थ्यांचा फायदा होणार
नव्या नियमांमुळे निश्चितपणे विद्यार्थ्यांचा फायदाच होणार आहे. त्यांच्यावर कुठलेही महाविद्यालय किंवा अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचा दबाव राहणार नाही. महाविद्यालय निवडण्यासाठी ते स्वतंत्र असतील. शिवाय त्यांना थेट महाविद्यालयात जावे लागणार नाही तर ‘एआरसी’मध्ये त्यांना यावे लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे शुल्क व गुणवत्तेची योग्य माहिती मिळू शकेल.
खासगी संस्थांच्या अफवांना बळी पडू नका
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या व्यावसायिक पदवी, पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशप्रक्रियेत २०१६-१७ पासून बदल करण्यात आला आहे. परंतु काही खासगी संस्थांकडून विद्यार्थी व पालकांना संभ्रम निर्माण करणारी माहिती देण्यात येत आहे. अशा अफवांना विद्यार्थी व पालकांनी बळी पडू नये.यासंदर्भातील अधिकृत माहिती संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दयानंद मेश्राम, सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय