अग्निशमन विभागातील कमंचारी सेवाप्रवेश नियमात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:07 AM2021-03-01T04:07:40+5:302021-03-01T04:07:40+5:30
शासनाची तत्त्वत: मंजुरी : पदभरतीचा मार्ग मोकळा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेतील अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातील ...
शासनाची तत्त्वत: मंजुरी : पदभरतीचा मार्ग मोकळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या सेवा प्रवेश नियमात बदल करण्याला मनपा सभेत २०१७ ला मंजुरी देण्यात आली होती. हा ठराव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या ठरावाला शासनाची मंजुरी नसल्याने विभागाला सरळ सेवा भरतीची प्रक्रिया मागील काही वर्षांपासून बंद असल्याने विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. ही पदे भरता यावीत, यासाठी राष्ट्रीय नागपूर काॅर्पोरेशन एम्प्लाॅईज असोसिएशनने शासनाकडे व पालकमंत्र्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. अखेर या प्रस्तावाला शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे.
मनपाची नऊ अग्निशमन केंद्र असून, या केंद्रांच्या माध्यमातून अग्निशमन सेवा पुरविली जाते. शहराचा मोठा विस्तार झाला आहे. उंच इमारती, शैक्षणिक संस्थांच्या इमारती, मॉल, रुग्णालये, बाजारपेठा अस्तित्वात आल्या आहेत. मात्र शहराच्या विस्तारानुसार अग्निशमन यंत्रणेचे बळकटीकरण झालेले नाही. या विभागात ८० टक्के पदे रिक्त आहेत. पदभरती प्रस्तावाला शासनाने मंजुरी द्यावी, यासाठी संघटनेचे अध्यक्ष
सुरेंद्र टिंगणे, कार्याध्यक्ष विलास चहांदे, जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे व कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे यांच्यासह हेमराज शिंदेकर, नितीन वैद्य, विलास कडू, योगेश बोरकर, ईश्वर मेश्राम, बाबा श्रीखंडे, संजय मोहले आदींनी पाठपुरावा केला. पालकमंत्री नितीन राऊत यांना शिष्टमंडळ भेटले. त्यांना प्रस्तावाला मंजुरी आणण्याची हमी होती. अखेर शासनाने तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती सुरेंद्र टिंगणे यांनी दिली.