काळानुरूप आव्हाने लक्षात घेता संघ शिक्षा वर्गाच्या अभ्यासक्रमात बदल
By योगेश पांडे | Published: May 17, 2024 05:22 PM2024-05-17T17:22:25+5:302024-05-17T17:22:51+5:30
पराग अभ्यंकर : नवीन नाव व नवीन अभ्यासक्रमासह संघाच्या राष्ट्रीय पातळीवरील वर्गाला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे देशभरात लोकसभा निवडणूकांचे वातावरण असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी मात्र राष्ट्रीय पातळीवरील कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय मध्ये व्यस्त झाले आहेत. डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरातील महर्षि व्यास सभागृहात शुक्रवारी या वर्गाची सुरुवात झाली. तृतीय वर्ष वर्गाऐवजी कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय हे नवीन नाव व यंदापासून लागू करण्यात आलेल्या नव्या अभ्यासक्रम ही यंदाच्या वर्गाची विशेषता आहे.
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी, मुकुंद सी.आर., रामदत्त चक्रधर, अ. भा. सेवा प्रमुख तसेच वर्गाचे पालक अधिकारी पराग अभ्यंकर तसेच वर्ग सर्वाधिकारी इकबाल सिंह प्रामुख्याने उपस्थित होते. संघ प्रणालीत प्रशिक्षण वर्गाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे जसजसे काम वाढत गेले तसतसे विविध प्रांतांमध्ये प्रशिक्षण वर्ग घेण्यास सुरुवात झाली. बंदीचा काळ आणि कोरोनाचा काळ वगळता संघाचे प्रशिक्षण वर्ग कधीही खंडीत झाले नाहीत. काळानुरूप प्रशिक्षण वर्गाचा कालावधी आणि अभ्यासक्रम यात बदल करण्यात आला. कार्यकर्त्याची विचारसरणी काय असावी, त्याच्यासमोरील आव्हाने काय आहेत, हे लक्षात घेऊन व्यवस्थेतही बदल करण्यात आले. पूर्वीच्या वर्गांमध्ये, शारीरिक कार्यक्रमांतर्गत संयम आणि धैर्य वाढविण्यावर भर दिला जायचा. आता आव्हाने बदलली आहेत. त्याचे संदर्भ समजून घेत या आव्हानांना उत्तर द्यायचे असल्याने तशा विषयांचाही या वर्गात समावेश करण्यात आला आहे. या वर्गात शिक्षार्थींना समाजातील सज्जन शक्तीशी जोडून आपली शक्ती कशी वाढवायची याचे व्यावहारिक प्रशिक्षण मिळणार आहे, असे पराग अभ्यंकर यांनी सांगितले. यंदाच्या वर्गात देशभरातून ९३६ शिक्षार्थी सहभागी झाले आहेत. १० जून रोजी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या उपस्थितीत या वर्गाचा समारोप होणार आहे.
यावेळी वर्ग कार्यवाह अशोक अग्रवाल, मुख्य शिक्षक निलेश भंडारी, सह मुख्य शिक्षक कुणाल जी., बौद्धिक प्रमुख उदय शेवडे, सह बौद्धिक प्रमुख कृष्ण प्रसाद व अणम, सेवा प्रमुख धनीराम, व्यवस्था प्रमुख सुनिल भुलगावकर व सहव्यवस्था प्रमुख नितीन एदलाबादकर हेदेखील उपस्थित होते.