आंंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमुळे नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन :देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:10 AM2019-02-03T00:10:42+5:302019-02-03T00:17:59+5:30
ऑरेंज सिटी मेट्रो मॉल हा नागपूरच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. यासोबतच दक्षिण-पश्चिम भागाच्या सर्वांगीण विकासासह अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे सर्वसामान्य जनतेला जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील व त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑरेंज सिटी मेट्रो मॉल हा नागपूरच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. यासोबतच दक्षिण-पश्चिम भागाच्या सर्वांगीण विकासासह अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे सर्वसामान्य जनतेला जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील व त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
नागपूर मेट्रो व महानगरपालिकेच्या ऑरेंज सिटी मेट्रो मॉल तसेच दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील रस्ते, वीज, पाणी आदी सर्व आधुनिक सुविधांच्या विकास कामांचा शुभारंभ शनिवारी जयताळा येथे झाला. या विकास कामांवर ३७८.२५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. मिहानच्या टॅक्सीवेसोबत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाच्या बांधकामांची सुरुवात लवकरच होत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
जयताळा येथील बाजार चौक येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव, स्थायी समितीचे अध्यक्ष विक्की कुकरेजा, महामेट्रोचे प्रबंध संचालक ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजित बांगर, वास्तुविशारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,‘मिहान प्रकल्पाच्या’आरक्षणातून हा भाग आता मुक्त होणार असून, येथील ७० घरांचे पुनर्वसन याच भागात करण्यात येणार आहे. टाकळीसीम येथील झोपडपट्ट्यांमधील घरे वाचविण्यासाठी येथील रस्ता ४० फुटांचा करण्यात येणार आहे. एकात्मतानगर येथील झुडपी जंगलांच्या जमिनीवरील घरांनाही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मालकी हक्क पट्टेवाटप करण्याची प्रक्रिया करता येऊ शकणार आहे. मिहान प्रकल्पामध्ये आगामी काळात ३० हजार रोजगारनिर्मिती उपलब्ध होऊ शकणार आहे. सोनेगाव तलावाचा परिसर सुशोभित व विकसित करण्यासाठी १८ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, लवकरच अधिकचे १८ कोटी रुपयेही देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ऑरेंज स्ट्रीट प्रकल्पाद्वारे महापालिकेला ५०० कोटीचा महसूल उपलब्ध होणार आहे. मेट्रो मॉलसारख्या प्रकल्पांमुळे जवळपास ५ हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे. ब्रॉडगेज रेल्वेच्या ट्रॅकवरच आता ब्रॉडगेज मेट्रोही धावू शकणार आहे. अजनी परिसरात पॅसेंजर हब तयार करण्यात येणार आहे. शहरातील विविध मार्केट परिसरांचा नागपूर मेट्रोद्वारे विकास करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी लवकरच इलेक्ट्रीक बसमध्ये मोफत प्रवास उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी प्रास्ताविक व संचालन केले. किशोर वानखेडे यांनी आभार मानले.
१३ विकास कामांचे डिजिटल भूमिपूजन
दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रात तब्बल १३ प्रस्तावित विविध विकास कामांचे डिजिटल भूमिपूजन यावेळी करण्यात आले. यामध्ये वर्धा रोड येथे ऑरेंज स्ट्रीट प्रकल्पांतर्गत भव्य मेट्रो मॉल, हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते जयताळा रोड ५.५० कि.मी. लांबीचा सिमेंट रोड, रस्त्यांच्या डांबरीकरणासह विविध मूलभूत सुविधा, अमृत योजनेंतर्गत ११ पाण्याच्या टाक्या, ज्येष्ठ नागरिकांकरिता ७४ ठिकाणी ग्रीन जीम तयार करणे, भूमिगत विद्युत वाहिन्यांची कामे, शहरातील ११ मोठ्या उद्यानांमध्ये ओला व वाळलेला कचरा ग्रेडर मशीनद्वारे बारीक करून ऑर्र्गेनिक वेस्ट कन्व्हर्टरद्वारे कंपोस्ट खत तयार करणे, टीव्हीएस कंपनीतर्फे सीएसआर योजनेद्वारा ३३ उद्यानांमध्ये ग्रीन जीम, ज्येष्ठ नागरिकांकरिता प्रत्येक झोनमध्ये तयार करण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण, ब वर्ग तीर्थक्षेत्र स्थळांचा विकास कार्यक्रमांतर्गत रेणुका माता मंदिर, यशोदा नगर परिसरात विविध विकास कामांचा शुभारंभ, टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने कार्यरत असलेले एकूण १७ आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्रांचे लोकार्पण आणि फुलोरा फाऊंडेशन मुंबई निर्मित इको फ्रेण्डली अशा ७१ शौचालयांची उभाराणी. या कामांचा समावेश होता.
माझ्या कुटुंबातून कुणीही राजकारणात येणार नाही -नितीन गडकरी
परिवारातून लीडर पैदा करणे हे आपल्याला मान्य नाही. माझ्या कुटुंबातून कुणीही राजकारणात येणार नाही, आणि मी येऊ देणारही नाही, असे केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे स्पष्ट केले.
आम्हाला आमच्या मुलांच्या रोजागारांची अजिबात चिंता नाही. आम्हाला चिंता आहे ती केवळ बेरोजगार मुलामुलींना रोजगार कसा मिळवून देता येईल याची, असेही गडकरी म्हणाले.